आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाठ झालेले फुप्फुस काढून वाचवले रुग्णाचे प्राण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - खोकला आणि पाठोपाठ थुंकीतून रक्त आल्याबरोबर कर्करोगाच्या भीतीने कोणीही अर्धमेला होतो. त्यातच तज्ज्ञांकडूनही तशी भीती व्यक्त केली गेली तर हातपाय गळणारच. प्रकाश शर्मा यांच्याबाबतही तेच झाले. पण डॉ. नीलेश चांडक यांनी योग्य निदान करत डाव्या फुप्फुसाला गाठ झाल्याचे स्पष्ट केले आणि फुप्फुसच छातीतून काढून टाकले. त्यामुळे प्रकाश शर्मा धोक्यातून मुक्त झाले आहेत.

चित्रपटांनी कर्करोगाचे प्रातिनिधिक लक्षण म्हणून खोकल्यानंतर आलेल्या थुंकीत रक्त नेहमीच दाखवले आहे. जळगावातील प्रकाश शर्मा हादरले ते त्यामुळेच. त्यानंतर त्यांनी सीटी स्कॅन करवून घेतले. त्याचा अहवाल पाहून त्यांना कर्करोग झाला असण्याची भीती काही डॉक्टरांनीही व्यक्त केली. कर्करोगतज्ज्ञ डॉ. नीलेश चांडक यांनी तपासणी केल्यावर डाव्या फुप्फुसाला गाठ (कार्सिनॉइड ट्यूमर) असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी प्रकाश शर्मा यांना डाव्या बाजूचे फुप्फुस काढण्याचा सल्ला दिला. या शस्त्रक्रियेनंतर आता ते ठणठणीत झाले असून, मुलाच्या लग्नाचा आनंद त्यांनी शतपटीत उपभोगला.

कार्सिनॉइड ट्यूमरविषयी
फुप्फुसात होणा-या गाठींपैकी 4 ते 5 टक्के गाठी या प्रकारच्या असतात. त्या कर्करोगासारख्या पसरत नाहीत. शस्त्रक्रियेवेळी भूल दिल्यानंतर केवळ निरोगी फुप्फुसाद्वारेच श्वासोच्छ्वास दिला जातो व त्यासाठी निष्णात भूलतज्ज्ञाची आवश्यकता भासते. डॉ. धीरज चौधरी यांनी हे काम केले. शस्त्रक्रियेसाठी डॉ. चांडक यांना डॉ. नवीन कासलीवाल आणि डॉ. श्रद्धा चांडक यांनी सहकार्य केले.

अशी झाली शस्त्रक्रिया
डाव्या बाजूचे फुप्फुस पूर्णपणे काढले गेले. त्यासाठी दोन तास लागले. केवळ 50 मिलिलिटर रक्तस्राव झाल्याने बाहेरून रक्त देण्याची गरज भासली नाही. शस्त्रक्रियेनंतर दुस -या दिवसापासूनच चालणे-फिरणे, व्यायाम व अन्नपाणी नियमितपणे सुरू झाले. तसेच चौथ्या दिवशी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
सगळे काही जळगावात
या शस्त्रक्रियेसाठी सीटी स्कॅन, गाठीची बायॉप्सी, प्लमोनरी फंक्शन टेस्ट आणि आवश्यक सर्व तपासण्या जळगावातच झाल्यामुळे बाहेर कुठेही जावे लागले नाही. मुंबईच्या तुलनेत केवळ एक-तृतीयांश खर्चात ही शस्त्रक्रिया जळगावात झाली, असा दावाही केला आहे.