आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरुस्ती सुरू, बोगदा बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोरील रेल्वेरुळांखालील बोगद्याची दुरुस्ती रेल्वे प्रशासनाने हाती घेतली आहे. हंबर्डीकर चौकातून पोलिस ठाण्याकडे जाताना डाव्या हाताच्या पहिल्या बोगद्यावरील लोखंडी अँगल आणि भिंतीचा आधार कमकुवत झाला आहे. त्यामुळे वाढलेली अपघाताची भीती पाहता दुरुस्ती होत असून, हा बोगदा आठ दिवस वाहतुकीसाठी बंद असेल.

रेल्वेलाइनमुळे भुसावळचे उत्तर आणि दक्षिण भाग असे विभाजन झाले आहे. या दोन्ही भागांना जोडणारे तीन बोगदे बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोर असून, त्यावरून रेल्वेलाइन गेलेली आहे. सुमारे 32 वर्षांपूर्वी या बोगद्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर वाढलेल्या रेल्वेगाड्यांची संख्या पाहता पुलाची क्षमता कायम ठेवणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने सोमवारी सकाळी मुंबईकडून आलेली रेल्वेगाडी पहिल्या बोगद्यावरील रेल्वेरुळांवरून जाताना डबे खाली-वर होत असल्याचे जाणवले. ही तांत्रिक बाब लक्षात येताच वरिष्ठ अधिकार्‍यांनी पुलाची तत्काळ पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घेतले. सध्या या बोगद्यावरून ये-जा करणार्‍या सर्व गाड्यांचा वेग ताशी 10 किलोमीटरपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे.

गुप्ता यांची भेट
वरिष्ठ अधिकार्‍यांनी बोगद्याच्या पाहणीचा अहवाल डीआरएम महेशकुमार गुप्ता यांच्याकडे सादर केला. त्यानंतर गुप्ता यांनी पाहणी केली. पुलाखालील पहिल्या बोगद्यातील वाहतूक थांबवून तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी दिले.

नवीन स्ट्रक्चर होणार
जुना झालेला ढाचा आणि वाढलेली रेल्वे वाहतूक पाहता या बोगद्याची दुरुस्ती गरजेची आहे. दुरुस्तीत बोगद्याचे आयुष्य वाढवण्यासाठी आवश्यक कामे होतील. त्यासाठी नवीन स्ट्रक्चर तयार होईल. सोमवारपासून दुरुस्तीचे काम सुरू झाले.

अशी घेतली तातडीने दक्षता
रेल्वेरुळांना कोणतीही इजा पोहोचू नये, यासाठी बोगद्याच्या छताला लोखंडी अँगलचा आधार देऊन पहिल्या बोगद्यातील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे आता दोन बोगदे वाहतुकीसाठी खुले असून, मधल्या बोगद्यातून दक्षिणेकडे, तर बाजूच्या लहान बोगद्यातून उत्तरेकडे (हंबर्डीकर चौक) गाड्या येत आहेत. मात्र, बंद केलेल्या बोगद्याजवळ प्रखर उजेड देणारा दिवा लावणे गरजेचे आहे; अन्यथा वाहनचालक अँगलला धडकू शकतो.

सन 1982नंतर 2014मध्ये दुरुस्ती
सन 1982मध्ये गॅसचे टँकर अडकून अपघात झाल्याने लोखंडी पुलाखालील वाहतूक आठवडाभर बंद होती. त्यानंतर तब्बल 32 वर्षांनी पुन्हा दुरुस्तीनिमित्त पहिला बोगदा आठ दिवस बंद असेल. सुमारे 40 मजूर दुरुस्तीचे काम करतील.