आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीचे तत्त्वज्ञान समजण्यासाठी आपल्यातील उणिवांचा शोध घ्या, तुषार गांधी यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आजचे युग इन्स्टंट आहे, दोन मिनिटात सर्व गोष्टी तयार लागतात. अशा परिस्थितीत गांधीजींचे तत्वज्ञान समजून घ्यायचे असल्यास आपल्या आत लपलेल्या महात्म्याला शोधणे आवश्यक आहे. बापूंचा मोहन ते महात्मा हा प्रवास आत्मशोधातून झाला आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केले. 
 
गांधी रिसर्च फाउंडेशन आणि गांधीयन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्प’च्या उद्घाटन वेळी ते बोलत होते. शुक्रवारपासून या लीडरशिप कॅम्पला सुरुवात झाली. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, गुजरात विद्यापीठाचे प्रो. सुदर्शन अय्यंगार, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सेवादास दलिचंद जैन उपस्थित होते. या कॅम्पला १८ राज्यातील युवक सहभागी झाले आहेत. 
 
युवकांना मार्गदर्शन करताना गांधी म्हणाले, आजच्या युवकांना गांधीजी कळाले ते मुन्नाभाई मधुन. स्वत:च्या प्रयत्नातून गांधींना समजण्याचा प्रयत्न व्हायला. बापू महात्मा व्हायच्या आधी मोहन होते; पण मोहनने आपल्यातील उणिवांवर मात केली. सत्याची सिद्धी जाणली आणि ते महात्मा झाले. युवकांनीदेखील आपल्यातील उणिवांवर मात करावी, हा या कॅम्पचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. 
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनुभूती रेसिडेन्शियल स्कूलच्या मुलांनी ‘वैष्णव जन तो’ हे भजन सादर केले. अश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले. विनोद रापतवार यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. डॉ. जॉन चेन्नादुराई यांनी प्रास्ताविकात महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती दिली. वॉटरशेड, ग्रामस्वराज्य, यूथ प्रोग्राम आदी बाबत त्यांनी माहिती दिली. हा कॅम्प १५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. 
 
गांधीतत्वात नायकाचे गुण : अशोक जैन : जैनइरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले, नेतृत्वाची परिभाषा काय असावी, नायकात कोणते गुण असावे, याचा विचार करताना आपण गांधीजींच्या तत्वापाशी येऊन थांबतो. सत्य, अहिंसा, प्रेम, सद्भावना या तत्वांचा स्वीकार केल्यास नेतृत्वगुणांचा विकास होऊ शकतो. 
 
तंत्रज्ञान करतेय नेतृत्व : अय्यंगार 
सुदर्शनअय्यंगार म्हणाले, नेतृत्व फक्त राजकीय नसते, समाजाला दिशा देण्याचे, चांगल्या वाट्याला नेणारे असावे. अलिकडे जगभरातून तंत्रज्ञान नेतृत्वाची जागा घेऊ पाहत आहे. 
 
युवकांशी साधला संवाद 
तुषारगांधी यांनी उद्घाटनाच्या सत्रानंतर युवकांशी संवाद साधला. युवकांनी त्यांना गांधीजी नेमके कसे होते. फाळणीच्या संदर्भात सत्यता, त्यांनी केलेले सत्याचे प्रयोग आदी विषयांवरून युवकांनी प्रश्न विचारले. युवकांच्या शंकाचे समाधान होईल, अशी उत्तरे त्यांनी दिली. या वेळी मूजे, नूतन मराठा, एसएसबीटी अादी आणि विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे युवक उपस्थित होते. 
 
 
बातम्या आणखी आहेत...