आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेढ्यामध्ये गुंगीचे अाैषध टाकून अडीच लाख लुटले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- प्रसादाच्या पेढ्यामध्ये गुंगीचे अाैषध टाकून एका भामट्याने दाणाबाजारातील सिप्रा कंपनीच्या व्यवस्थापकाला बेशुद्ध करून अडीच लाख रुपये लुटून नेल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी ७.४५ वाजता घडला. रविवारी संबंधित व्यवस्थापकाला शुद्ध अाल्यानंतर हा प्रकार उजेडात अाला.

दाणाबाजारात सिप्रा कंपनीचे कार्यालय अाहे. या कंपनीकडे जिल्ह्यासाठी बीएसएनएल कंपनीची फ्रँचाइजी अाहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व किरकाेळ विक्रेत्यांकडील रिचार्ज व्हाऊचर कार्ड विक्रीची वसुली सिप्रा कंपनीकडून केली जाते. कंपनीचे व्यवस्थापक म्हणून विकास काशिनाथ मराठे (वय ३१, रा. कासमवाडी) हे काम बघतात. शनिवारी सायंकाळी ७.४५ वाजता मराठे हे दरराेजचा हिशेब करत कार्यालयात एकटेच बसले हाेते. त्या वेळी कार्यालयात एक ३५ ते ४० वर्षे वयाचा अंगात निळ्या रंगाचे चाैकटींचे शर्ट अाणि कपाळावर टिळा लावलेला तरुण अाला. त्याच्या हातात पेढ्यांचा एक बाॅक्स हाेता. हनुमान जयंतीचा प्रसाद असल्याचे सांगून त्याने मराठे यांना एक पेढा दिला. त्यानंतर ताे तरुण दुकानातील वरच्या मजल्यावर प्रसाद देण्यासाठी जात असताना मराठे यांनी वर काेणीच नसल्याचे सांगितले. त्यामुळे तरुणाने अाणखी एक पेढा मराठे यांना दिला. मात्र, पेढा खाल्ल्यानंतर १० ते १५ मिनिटांनी मराठे यांना चक्कर येऊन डाेके दुखू लागले. या वेळी एक व्यक्ती सुटे पैसे मागण्यासाठी दुकानात अाली त्या वेळी मराठे यांना काहीही सुचत नव्हते. सुटे पैसे मागणारी व्यक्ती काेण हाेती ते त्यांना दिसले नाही. त्यानंतर काही मिनिटांतच मराठे बेशुद्ध झाले. रात्री ८.४५ वाजता कंपनीचे कर्मचारी विजय ठाकूर हे कार्यालयात अाले त्या वेळी मराठे बेशुद्धावस्थेत दिसले. त्यांनी मराठे यांना रुग्णालयात दाखल केले.

रविवारी आले लक्षात
मराठेरविवारी सकाळी शुद्ध अाल्यावर त्यांनी कर्मचाऱ्याला कार्यालयातील गल्ल्यामधील अडीच लाख रुपये बघण्यास सांगितले. त्यानुसार कर्मचाऱ्याने कार्यालयात जाऊन पाहिले; परंतु पैसे मिळाले नाहीत. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.