आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन चोरांनी दिली राज्यातील चोर्‍यांची कबुली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातील सराफ बाजारातील ज्वेलर्समध्ये चोरी करून पळ काढणार्‍या दोघांनी अनेक गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यात धुळयासोबतच इतर जिल्ह्यातील गुन्ह्यांचाही समावेश आहे. या टोळक्याचे संबंध थेट राजस्थानमधील इराणी गॅँगशी असल्याची माहिती पोलिस प्रशासनातर्फे देण्यात आली.

आग्रा रोडवरील सराफ बाजारात असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्समध्ये दागिने लुटीचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी इनायत अली मुजरहुसेन खान (22) आणि फर्मानअली फिरोजअली (33, दोघे रा. वॉर्ड नंबर तीन, संजय कॉलनी, छाबडा, राजस्थान) यांना संतप्त नागरिकांनी मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. याप्रकरणी दुकानमालक संदीप राजेंद्र मुळीक यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांकडून अनेक गुन्ह्यांची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दोघांची चौकशी केल्यावर त्यांनी औरंगाबाद, मुंबई, नाशिक, पुणे, अहमदनगर, संगमनेर येथेही चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे धुळे पोलिसांच्या तपासानंतर या दोघांना इतर जिल्ह्यातील पोलिसही ताब्यात घेऊ शकतात. याशिवाय या दोघांनी धुळयातील काही भागात सोनपोत लंपास केल्याची माहितीही समोर येऊ पाहते आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या दोघांचे संबंध राजस्थानमध्ये उच्छाद मांडणार्‍या इराणी गॅँगशी असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली. अर्थात या गॅँगमधील हे दोघे सदस्य असले तरी इतर जणांचा धुळयातील गुन्ह्यात समावेश आहे किंवा नाही ? हे पोलिस तपासातून समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या या संशयितांपैकी एक जण पोलिस कोठडीत तर दुसरा धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक कोळी, कोमलसिंग परदेशी, नरेंद्रसिंग कच्छवा, ओंकार गायकवाड, गणेश सोनवणे, गणेश पाटील पुढील तपास करीत आहेत.

पोलिस असल्याची बतावणी
‘आम्ही पोलिस आहोत’ असे सांगून ही टोळी गंडा घालते. या पद्धतीचे धुळयातही काही गुन्हे घडले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गांर्भीय वाढले आहे. या प्रकरणी माहिती देण्यास नागरिक समोर आल्यास दोघा संशयितांकडून इतर गुन्हेही उघडकीस येऊ शकतात.

चोराच्या उलट्या बोंबा
दोघा संशयितांपैकी इनायत अली यानेही तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीनुसार चोरी करून पळ काढताना नागरिकांनी पाठलाग करून पकडले. यानंतर लाकडी दांड्याने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यावरून या जमावातील सुमारे 20 ते 25 जणांविरुद्ध भादंवि कलम 143, 147, 148, 149, 234, 504, 34 अन्वये दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणार्‍यांची ओळख अद्याप पटली नसल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सध्या धुळे शहर पोलिस या दोघांकडे चौकशी करत आहेत. त्यांनी इतर जिल्ह्यात केलेल्या चोरीची कबुली दिली आहे. तसेच धुळयातील सोनपोत चोरीच्या काही घटनांबाबत त्यांच्यावर संशय आहे. धुळे पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच या दोघांना इतर जिल्ह्यातील पोलिसांकडे देण्यात येईल. चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी

इतर राज्यातील गुन्हेगार येतात सतत धुळयात
धुळयात होणार्‍या चोरी व गुन्ह्याच्या घटनांमध्ये परप्रांतीय चोरट्यांचा हात असल्याचे प्रकार यापूर्वीही उघडकीस आले आहेत. गेल्या महिन्यात वरखेडी फाट्याजवळ झालेल्या गोळीबारानंतर कार लांबवण्यात आली होती. यानंतर घटनेचे धागेदोरे अंडरवर्ल्ड व इंदूरपर्यंत असल्याचे समोर आले होते. जुलै महिन्यात पुरमेपाडाजवळील रेणुका पेट्रोल पंपावर झालेल्या सशस्त्र दरोड्यानंतर मध्य प्रदेशातील झाबुआ गावातील काहींना अटक झाली होती. या कुख्यात टोळय़ांवर आजही महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानमध्ये असंख्य गुन्हे दाखल आहेत. तर सन 2011मध्ये धुळयातील देना बॅँकेत झालेल्या चोरीनंतर आंध्र प्रदेश येथून काही संशयितांना अटक झाली होती. यापूर्वीही परराज्यातील टोळके धुळयात चर्चेत राहिले आहेत.