आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रहशांतीसाठी जैनांना 2 दिवसांची सुटी मंजूर, दीर्घायुष्य व मन:शांतीसाठी करायचाय विधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - दीर्घायुष्य व मन:शांतीसाठी नक्षत्र ग्रहशांती पूजा करायची इच्छा आहे. त्यासाठी दोन दिवसांची सुटी मिळावी, असा अर्ज जळगाव घरकुल घोटाळ्यातील प्रमुख संशयित सुरेश जैन यांनी धुळे विशेष न्यायालयात दाखल केला आहे. सरकारी वकिलांनी त्याला आक्षेप घेतला हाेता. मात्र विशेष न्यायाधीश आर.आर. कदम यांनी जैन यांना पूजेसाठी परवानगी दिली आहे.
घरकुल घाेटाळ्यात सुरेश जैन यांच्या वतीने पूजा करण्याची परवानगी मिळण्यासाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आला. सध्या देवपुरात भाडेतत्त्वावर घेतलेल्या निवासस्थानी दोन दिवस ही पूजा करण्याची इच्छा जैन यांनी या अर्जात व्यक्त केली अाहे. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद एेकल्यानंतर न्यायालयाने जैन यांना पूजेसाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार १२ व १३ मे रोजी जैन यांना पूजेसाठी वेळ देता येणार आहे. पूजेसाठी जाताना जैन यांनी पोलिस बंदोबस्तात जावे, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, यानंतर याच घाेटाळ्यातील अाणखी एक अाराेपी जगन्नाथ वाणी यांनीदेखील नियमित वैद्यकीय तपासणीसाठी न्यायालयात अर्ज सादर केला. डॉ. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाने वाणी यांची आरोग्य तपासणी करावी व त्याचा अहवाल १३ मे रोजी सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सरकारी वकिलांचा विराेध
दीर्घायुष्याकरिता महामृत्यूंजय मंत्राचा जप व पूजा केली जाते. तसेच नक्षत्र ग्रहशांती पूजा बाळाच्या जन्मानंतर साधारणत: वर्षभरात करावी लागते, असा युक्तिवाद करत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी जैन यांच्या अर्जाला विरोध दर्शवला हाेता. मात्र ताे न्यायालयात टिकला नाही.

डॉ.गेडाम यांची साक्ष अपूर्ण
खटल्यातील तक्रारदार डॉ. प्रवीण गेडाम हे सध्या नाशिक महापालिकेचे आयुक्त आहेत. कुंभमेळा जवळ अाल्यामुळे शुक्रवारी पालकमंत्री व आरोग्य विभागाच्या बैठकीमुळे ते न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे डॉ. गेडाम यांची साक्ष अजूनही अपूर्ण असून ती २५ मे रोजी नोंदवली जाणार आहे.