जामनेर (जळगाव) - सातवीत शिकणारी मुलगी डालीबाई शाळेत निघाली होती, लहानगा चरण अंगणात खेळत होता. माेठा मुलगा किरण मजुरीसाठी घराबाहेर पडला हाेता. पत्नी दुर्गाबाई घरकामात होती. तेवढ्यात शेतात गेलेले केशरीमल नाईक घरी परतले. सर्वांना जवळ बोलावून त्यांना बिलगून ढसाढसा रडत
आपल्या बंजारी भाषेत म्हणत होते, "मरेर इच्छा कोनी, पंळ जगळों कठीण छं... जहर पिलदो छू...' त्यांच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच पत्नीने हंबरडा फोडला. शेजारी जमले. केशरीमल यांना जामनेरच्या रुग्णालयात नेले, पण नियतीने डाव साधला. उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला.
खडकी येथील केशरीमल गुलाब नाईक (45) या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती आहे. त्यांनी मागील वर्षी शेतात विहीर खोदली; मात्र विहिरीला पाणी लागले नाही. यावर्षी दोन एकर पैकी दीड एकरवर कापसाची लागवड केली. त्यासाठी विकास सोसायटीकडून 26 हजार कर्ज घेतले. तसेच शेतीच्या इतर खर्चासाठी खासगी सावकाराकडूनही कर्ज काढले. कर्ज फेडण्यासाठी मदत होईल म्हणून शेजारील शेतकऱ्याची चार एकर शेती उक्ताने करण्यासाठी घेतली. मात्र, उत्पन्न निघाले नाही. रोजचा प्रपंच चालवणे अवघड असताना कर्ज फेडायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. सोमवारी सकाळी सहा वाजता ते शेतात गेले. शेतातच विष प्राशनकेल्यानंतर मुलाबाळांसाठी त्यांची पावले घराकडे वळली. घरी पोहोचताच शाळेत जाणारी मुलगी डालीबाईला थांबवून बाहेर खेळत असलेला लहान मुलगा चरण याला जवळ बोलावले. यावेळी माेठा मुलगा किरण (15) मजुरीसाठी गेलेला हाेता. मुलगा, मुलगी पत्नी दुर्गाबाईला जवळ बोलवत ते म्हणाले की, ‘मरण्याची इच्छा नाही, पण जगणं अशक्य असल्यामुळे मी विषप्राशन केले आहे’ शेतकऱ्यांच्या तोंडून हे वाक्य एेकताच त्यांच्या पत्नीने आरडाओरड करून शेजारच्यांना बोलावले. शेजाऱ्यांनी त्वरित त्यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. खडकीत आठ-दहा पत्र्यांच्या खाेलीत केशरमल राहत होते. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले एक मुलगी आहे.