आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूसदृश 2 रुग्ण बालिकांचा मृत्यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर - डेंग्यूसदृश आजारामुळे तालुक्यातील फत्तेपूरच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गावात ठिकठिकाणी असलेल्या घाणीच्या साम्राज्याचे ‘दर्शन’ घडवत गुरुवारी अधिकार्‍यांना धारेवर धरले.

हर्षदा जनार्दन इधाटे या नऊ वर्षाच्या मुलीचा बुधवारी औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाठोपाठ बुधवारी रात्रीच सरला विश्वनाथ पारधी या 15 वर्षीय युवतीचाही जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत दोन्ही मुली फत्तेपूर येथील जवळपासच्याच परिसरात रहातात. गेल्या काही दिवसांपासून गावात तापांचे रुग्ण मोठय़ाप्रमाणावर आढळून येत आहेत. यापैकी काही रुग्णांच्या पांढर्‍यापेशी झपाट्याने कमी होत आहेत. असाच काहीसा प्रकार सरला व हर्षदा यांच्याबाबत घडला. हर्षदा हिच्यावर प्रथम गावात व नंतर जामनेर येथे उपचार केले, मात्र उपयोग होत नसल्याने दोघींना जळगावला व औरंगाबादला हलवले होते. मात्र दोघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ग्रामपंचायतीचे पदाधिकारी निष्प्रभ
नियमित पगार मिळत नाही म्हणून कर्मचार्‍यांनी दोन महिन्यांपूर्वी महिनाभर संप पुकारला होता. आता पगार नियमित होत असूनही गावात स्वच्छता होत नाही. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्या आहेत, उकिरडे साचले आहेत. ग्रामपंचायत सदस्य निष्प्रभ ठरले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी गुरुवारी अधिकार्‍यांसमोर संताप व्यक्त केला. या वेळी पंचायत समिती सभापती सरिता भंसाली, माजी पंचायत समिती सदस्य संजय चौधरी, बबलू भंसाली गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

अधिकार्‍यांची भेट
एकाच दिवशी दोन बळी गेल्याने जिल्हा हिवताप अधिकारी हेमंत नारखेडे, गटविकास अधिकारी एकनाथ साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी अविनाश घाटे हे परिस्थितीच्या पाहणीसाठी गावात आले. गावातील घाणीच्या साम्राज्यामुळे एकाच दिवशी दोन मुलींचा बळी गेल्याचे आरोप करून ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत अधिकार्‍यांना धारेवर धरले. एवढेच नव्हे तर ठिकठिकाणी साचलेले घाणीचे साम्राज्य अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, अधिकार्‍यांनी दोन्ही मयत मुलींच्या घरी भेट दिली.