आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव पालिकेत निलंबित दोन्ही ठराव पुनर्जीवित करण्याच्या हालचाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - व्यापारी संकुलांसंदर्भातील दोन्ही ठराव निलंबित केल्यानंतर अडचणीत सापडलेल्या पालिकेतील सत्ताधार्‍यांनी आता ताकद पणाला लावल्याचे चित्र आहे. त्याच दृष्टीने दोन्ही ठराव पुनर्जीवित करण्यासाठी एका ज्येष्ठ नेत्याने नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली. त्यामुळे येत्या गुरुवारपर्यंत नवीन आदेश निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आनंदात असलेल्या गाळेधारकांना पुन्हा ‘टेन्शन’ येणार आहे.

पालिकेवरील 340 कोटींचे कर्ज फेडण्यासाठी मालमत्तांची विक्री अथवा मालमत्तांचे नव्याने करार करणे हेच पर्याय आहेत. त्यामुळे सोन्याची कोंबडी ठरलेल्या महापालिकेने आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी संकुलातील गाळे प्रीमियम घेऊन 30 वर्षाच्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टय़ावर देण्याचे दोन ठराव केले होते. त्यानुसार महापालिकेला हुडकोचे कर्ज फेडणेदेखील शक्य होते. परंतु गाळेधारकांनी मुख्यमंत्र्यांकडे अपील दाखल करून ठरावांना स्थगिती देण्याची विनंती केली होती. त्यानुसार नगरविकास विभागाने दोन्ही ठराव निलंबित केले होते.

या निर्णयामुळे गाळेधारकांना दिलासा मिळाला होता, तर महापालिका अडचणीत आली होती. अशा परिस्थितीत दोन्ही निलंबित ठराव पुनर्जीवित करणे हा एकच पर्याय असल्याचे लक्षात आल्यानंतर पालिकेतील सत्ताधारी गटातर्फे पावले उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून की काय खान्देश विकास आघाडीचे नेते तथा स्थायी समिती सभापती रमेश जैन यांनी शनिवारी दुपारी नगरविकास विभागाचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांची भेट घेतल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. सुमारे दीडतास चाललेल्या बैठकीत पालिकेसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानुसार लवकरच प्रशासनाच्या दृष्टीने दिलासादायक निर्णय मिळण्याची शक्यता वाढली आहे. गुरुवारपर्यंत पुन्हा आदेश निघून निलंबित ठराव पुनर्जीवित होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास गाळेधारकांसमोरील डोकेदुखी वाढणार आहे.