आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकवणीला जातो सांगून निघाले आणि घरी परतले तर ...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - शिकवणीला जातो सांगून घरून निघालेले दोन्ही मित्र थेट तापी नदीवर पोहायला गेले. मात्र, पोहता येत नसल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता जुन्या पुलाजवळ ही हृदयद्रावक घटना घडली. मृत दोन्ही विद्यार्थी शहरातील के.नारखेडे शाळेत 11 वी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत होते.
अभिषेक अनिल पाटील (वय 16, रा. प्रभू लिला अपार्टमेंट, शारदानगर, भुसावळ) आणि त्याचा मित्र सोहन अरूण पाटील (वय 16, रा.चक्रधरनगर, भुसावळ) हे दोन्ही मित्र शुक्रवारी सकाळी शिकवणीला जातो, असे सांगून घरून निघाले. मात्र, शिकवणीऐवजी अभिषेक आणि सोहनने पोहण्यासाठी थेट तापीनदीचे पात्र गाठले. तापीवर गेल्यावर दोघांनी त्यांच्या अन्य दोन मित्रांशी भ्रमणध्वनीवरून बोलणे करून पोहण्यासाठी बोलावले. या दोन्ही मित्रांसमोरच पाठीवरील क्लासचे दप्तर काठावर ठेवून अभिषेक आणि सोहनने तापीच्या पात्रात पोहण्यासाठी उडी घेतली. मात्र, पाणी जास्त असल्याने त्यांचा निभाव लागला नाही. पाण्यात बुडायला लागताच दोघांनी मदतीसाठी याचना केली. मात्र, दुर्दैवाने आजूबाजूला पोहता येणारे कोणीही नसल्याने ते बुडाले.
अभिषेक आणि सोहनला पाण्यात बुडताना पाहून काठावरील त्यांच्या मित्राने थेट तापी पुलाजवळील वस्तीकडे धाव घेतली. दोन्ही विद्यार्थी बुडाल्याचे रहिवाशांना सांगितले. मात्र, मदत मिळण्यापूर्वी अभिषेक आणि सोहनचा मृत्यू झाला होता. घटनेबद्दल पोलिसांना माहिती मिळताच बुडालेल्या विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी पट्टीच्या पोहणा-यांची मदत घेण्यात आली. सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास दोघांचे मृतदेह हाती लागले.

तीन दिवसांपासून जायचे नदीवर
शाळा आणि शिकवणीच्या बहाण्याने तापीवर पोहायला जाण्याचा दोघांचा दिनक्रम तीन दिवसांपासून सुरू होता. मात्र, नदीमध्ये जास्त पाणी असल्याने मासे पकडणारे त्यांना पिटाळून लावत होते. शुक्रवारी मात्र त्यांनी पाण्यात उडी घेतली. पण, पोहता येत नसल्याने घात झाला. नदीकाठावर त्यांनी ठेवलेल्या दप्तरात टॉवेल सापडल्याने पोहण्यास जाण्याचा त्यांचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता, अशी चर्चा घटनास्थळी ऐकायला मिळाली.

दोन्ही विद्यार्थी होते एकुलते एक
अभिषेक पाटील हा शहरातील शारदानगरात ‘प्रभू लिला अपार्टमेंट’मध्ये राहत होता. त्याचे वडील अनिल पाटील यांचा कागदी पुठ्ठा निर्मितीचा छोटेखानी कारखाना आहे. अभिषेकच्या पश्चात आई-वडील आणि लहान बहिण असा परिवार आहे. तर सोहन पाटील त्याच्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य होते. सोहनचे वडील अरूण पाटील पतसंस्थेत लिपिक म्हणून काम करतात. शहरातील खाचणे हॉलजवळील श्रीकृष्ण मंदिराजवळ त्यांचा रहिवास आहे.

यांनी दिला मदतीचा हात
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक डी.डी.पगारे, सहायक निरीक्षक रवींद्र मानकर, के.नारखेडे शाळेचे मुख्याध्यापक जी.एम.महाजन, शिक्षकांसह तापी नदीवर आले. नगरसेवक युवराज लोणारी यांच्यासह प्रमोद सावकारे यांनी मदत केली. पट्टीच्या पोहणाºया 10 जणांनी घेतलेल्या शोधात सर्वप्रथम सोहन आणि नंतर अभिषेकचा मृतदेह सापडला. 9.45 वाजेच्या सुमारास दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पालिका रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टर नसल्याने नगरसेवक लोणारी यांनी थेट यावलहून डॉक्टरांना बोलावणे केले. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तिसरी घटना
शहरानजीक येथील तापी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची पाच दिवसातील ही तिसरी घटना आहे. उन्हाळ्यात तापीच्या पात्रात अवैधरित्या गौणखनिजाचे मोठ्या प्रमाणात खोदकाम होते. ब्लास्टिंग करून दगड काढले जातात. या मुळे नदीत कपारी, खोल डोह तयार होतात. पावसाळ्यात या डोहात तुडुंब पाणी साचल्याने पोहायला जाणाºयांच्या जीवाला या मुळे धोका होऊ शकतो. प्रशासनाने अशा ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक लावावेत. गणेश आणि दुर्गा विसर्जनापूर्वी ही खबरदारी घेणे गरजेचे आहे.