आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: दोन विषयांमध्ये नापास झाल्यामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव: दहावीच्या परीक्षेत दोन विषयांमध्ये नापास झाल्यामुळे नांद्रा येथील विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. ऑनलाइन निकाल जाहीर होताच तासाभरातच ही घटना घडली. चेतन रमेश पाटील (वय १६) हा नांद्रा गावातील श्री दत्त हायस्कूलमध्ये शिकत होता. मंगळवारी दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला तेव्हा तो गावातीलच रसवंतीवर मित्रांसोबत बसला होता. काही वेळाने मोबाइलवर त्यांनी सर्व मुलांचे निकाल पाहिले. यात चेतन दोन विषयांत नापास असल्याचे समजले. नापास झाल्याचे समजल्यानंतर तो काहीवेळ मित्रांसोबतच गप्पा मारत होता. नापास झाल्याचे दु:ख त्याच्या चेहऱ्यावर दिसून आले नाही. नंतर तो घरी गेला. काही वेळाने त्याला बोलावण्यासाठी एक मित्र घरी गेला असता, चेतनने गळफास घेतल्याचे दिसून आले. गावातील तरुणांनी त्याला खाली उतरवले. खाली उतरवल्यानंतर अर्ध्या मिनिटातच त्याची प्राणज्योत मालवली. त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वडिलांनी सामान्य रुग्णालय गाठून आक्रोश केला. 
 
घरी कोणी नसताना केली आत्महत्या 
चेतनचे वडील रमेश पाटील हे शेतीकाम करतात. त्याचा लहान भाऊ ललित हा धुळे येथे मामाकडे गेला होता. ललितला घेण्यासाठी त्याची आई मंगळवारी सकाळीच धुळ्याला गेली. तर वडील कामानिमित्त जळगावला आले होते. दुपारी घरी कोणीच नसताना चेतनने घरातील लोखंडी हुकला साडी बांधून गळफास घेतला. चेतन हा अत्यंत मिश्कील स्वभावाचा होता. नापास झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर काही दु:ख नव्हते. तरीदेखील त्याने घरी जाऊन असा निर्णय का घेतला? याबाबत सर्वच जण अवाक झाले. 
बातम्या आणखी आहेत...