आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- अवजड वाहतुकीस बंदी असलेल्या शिवाजीनगर पुलावरून टॉवर चौकाकडे येणार्या मोटारसायकलस्वाराचा सिमेंटने भरलेल्या ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नवजीवन क्लॉथ स्टोअर्स समोर घडली. याच पुलावर अवजड वाहनामुळे पाच महिन्यांपूर्वी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता.
शिवाजीनगर भागातून टॉवर चौकाकडे गणपतीनगरातील रहिवासी भानुदास पुना महाजन (वय 59) पॅशन मोटारसायकलने (एमएच-19,ईओ-5255) येत होते. त्याच वेळी सिमेंटच्या गोण्या घेऊन येणार्या भरधाव ट्रकने (एमएच-19, झेड- 1272) जोरदार धडक दिल्याने ते ट्रकच्या मागच्या चाकाखाली आले. ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहास उचलण्यास देखील कोणीही पुढे आले नाही. अखेर शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेहाला रुग्णवाहिकेमधून जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून, घटनास्थळावरून पसार झालेला ट्रकचालक शंकर बाबुराव कोकाळकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
..तर अपघात टळला असता
शिवाजीनगरमधील पुलावर सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अवजड वाहतुकीस बंदी आहे. मात्र, शहरातील सिग्नल यंत्रणा दुपारी बंद असते. त्यामुळे वाहतूक पोलिसही जागेवर थांबत नाहीत. बंदीच्या वेळेत वाहतूक पोलिसच जागेवर नसल्याने अवजड वाहनांच्या बंदीच्या आदेशाची सर्रास पायमल्ली होत आहे. वाहतूक पोलिस जागेवर राहिले असते तर अपघात टळला असता. वाहतूक पोलिसांच्या निष्क्रियतेचाच हा बळी असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
बंदीचे फलकही गायब
पाच महिन्यांपूर्वी सिमेंट घेऊन जाणार्या अवजड वाहनाखाली पायी जाणार्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. त्या वेळी संतप्त नागरिकांनी आंदोलन करीत अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी केली होती. नागरिकांचा रोष वाढल्यानंतर महापालिका प्रशासनाने पुलाच्या दोन्ही बाजूला बंदीचे फलक लावले. दोन स्वतंत्र वाहतूक पोलिसही नियुक्त करण्यात आले. मात्र, नंतरच्या काळात फलकही गायब झाले आणि वाहतूक पोलिसही दिसेनासे झाले. जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मालवाहतूक करणार्या अवजड वाहनांना बंदी घातली आहे. मात्र, या बंदीच्या आदेशाकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. महापालिका प्रशासन व वाहतूक शाखा या दोघांमधील समन्वयाच्या अभावामुळे अवजड वाहनांवरील बंदी कागदावरच राहिली आहे. रस्ते बंद करून महापालिका आपली जबाबदारी झटकत आहे; तर पोलिस कारवाईचा आव आणून मोकळे होतात.
वर्दळीचा पूल ‘डेथ स्पॉट’!
शिवाजीनगर पूल वर्दळीचा मानला जातो. दुचाकी व चारचाकी वाहनांची प्रचंड वर्दळ असलेल्या या पुलावरून पावलांच्या गतीने वाहने पुढे सरकतात; असे असतानाही या पुलावर अपघात होऊन नागरिकांचे बळी जात आहेत. वाहतूक पोलिस जागेवर असले तरी अवजड वाहतूक रोखली जात नसल्याने नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्यामुळे वर्दळीचा हा पूल ‘डेथ स्पॉट’ झाला आहे.
मनमिळावू स्वभावाचे भानूभाऊ
भानुदास महाजन यांचे सुरेश फूड वर्ल्डसमोर अनेक वर्षांपासून भगवती पान सेंटर आहे. मनमिळावू स्वभावामुळे आदर्शनगर व गणपतीनगर परिसरात भानूभाऊ या नावाने ते परिचित होते. त्यांच्या मागे तीन मुले, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.
पर्यायी मार्गांकडेही महापालिकेचे दुर्लक्ष
अवजड वाहनांच्या पर्यायी मार्गांबाबत महापालिकेने गांभीर्याने कोणतीही पावले उचलली नसल्यानेच नियमांचे उल्लंघन होत आहे. त्याची झळ सामान्य नागरिकांना सोसावी लागत आहे. शिवाजीनगर पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याने या मार्गावरून येणारी अवजड वाहने खोटेनगर, गुजराल पेट्रोलपंपाकडून जात होती. मात्र, गुजराल पेट्रोलपंप किंवा खोटेनगर परिसरातील नागरिकांना या वाहनांचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी या वाहनांना विरोध केला. प्रसंगी वाहनांवर दगडफेकही झाली. महापालिकेने पर्यायी मार्गांबाबत कोणतेही सहकार्य न केल्यानेच अवजड वाहने नियमांचे उल्लंघन करीत असल्याची स्थिती आहे. त्याचे गांभीर्य महापालिकेकडे नसल्यानेच हा पूल ‘डेथ स्पॉट’ होत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.