आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाषण वेगळे तरीही उद्धव भावले कमीच !, राज्यभरातील शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उद्धव ठाकरेंच्या भाषणात वेगळेपण होते, असे प्रशस्तिपत्र जाहीरपणे देणारे शिवसैनिक खासगीत मात्र आपली निराशा लपवू शकत नाहीत. बाळासाहेबांची सर कोणालाच येणार नाही, यावर ठाम असणा-या शिवसैनिकांनी उद्धवजींना अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे, असाच निष्कर्ष मनाशी काढला आहे.


बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेनेचा पहिलाच वर्धापन दिन बुधवारी झाला. त्यानंतर ‘टीम दिव्य मराठी’ने संपर्क साधला असता राज्यभरातील शिवसेनेचे पदाधिकारी आपली निराशा लपवू शकले नाहीत. मात्र, पक्षावर निष्ठा असल्यामुळे ही भावना उघडपणे व्यक्त करण्यास ते तयार नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे त्यांनी कौतुक चालवले असले तरी बाळासाहेबांच्या पश्चात पक्षात चमक आणण्यात उद्धव यशस्वी होतील काय, ही शंका शिवसैनिकांच्या मनात षण्मुखानंदमधील भाषणानंतर ठळकपणे डोकावू लागली आहे.


बुधवारी उद्धव ठाकरे काय संदेश देतात, याविषयी राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये कुतूहल होते. मात्र, बाळासाहेबांकडून संदेश घेण्यासाठीचा जो उत्साह दरवर्षी संचारायचा त्याची सर या कुतूहलाला नव्हती, असे मुंबईतील एका ज्येष्ठ शाखाप्रमुखाचे म्हणणे आहे.


स्टाइल बदलली : उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची ‘स्टाइल’ बदललेली जाणवली. नीट तयारी करून आणि समोर मुद्दे ठेवून त्यांनी विचारपूर्वक भाषण केल्यामुळे या वेळचे त्यांचे भाषण वेगळे वाटले, अशाही प्रतिक्रिया आहेत. ज्यांना हे वेगळेपण जाणवले त्यांच्यापैकी काहींना आपल्या नेत्यातला आत्मविश्वास वाढल्याचे वाटते आहे, तर काहींनी या बदलापेक्षा उत्स्फूर्तता अधिक महत्त्वची होती, असे नमूद केले.


सर्वांची भावना सारखीच : मराठवाड्यातील सहा जिल्हाप्रमुख, काही माजी जिल्हाप्रमुख यांच्यासह दोन आमदार आणि एका माजी आमदाराशी झालेल्या गप्पांचा सूरही उद्धव ठाकरे भावले नाहीत, असाच होता. उत्तर महाराष्‍ट्रातल्या तीन जिल्हाप्रमुखांनीही याच भावनेशी मिळतीजुळती मते व्यक्त केली. एका जिल्हाप्रमुखाने मात्र ‘साहेबां’चे भाषण आधीच्या भाषणांपेक्षा सर्वोत्तम झाल्याचे ठासून सांगितले. आणखी एका जिल्हाप्रमुखाने भाषणातले वेगळेपण जाणवले हे नमूद करण्यापलीकडे मत व्यक्त करणे टाळले. सोलापूर, पुणे जिल्ह्यातील पदाधिका-यांनी आधी गोडवेच गायले. खासगीत मात्र यंदाचा वर्धापन दिन अंगात संचारलाच नाही, हे कबूल केले.


कानउघाडणी झालीच नाही : दरवर्षी बाळासाहेबांकडून शिवसैनिकांना काहीतरी ‘कार्यक्रम’ मिळत असे. मित्रपक्षांसह स्वकीयांच्या चुकांवरही बाळासाहेब बोट ठेवत. त्यातून मित्रपक्षांनाही आपले धोरण बदलावे लागत होते. सध्या सुरू असलेल्या अडवाणी-मोदी प्रकरणावरही बाळासाहेबांनी नक्कीच कानउघाडणी केली असती. यापैकी उद्धव ठाकरेंकडून कोणतीच अपेक्षा पूर्ण झाली नाही, असे काही ज्येष्ठ पदाधिका-यांनी खासगीत सांगितले.


भाषणाविषयीचे निरीक्षण
‘ऑन रेकॉर्ड’ ‘ऑफ दी रेकॉर्ड’
मुद्देसूद होते उत्स्फूर्तता कमी
हिंदुत्वाविषयी स्पष्टता बाळासाहेबांची सर नाही
पक्षाची दिशा कळाली संदेश मिळाला नाही
विरोधकांवर टीका केली मित्रांकडे दुर्लक्ष केले