आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंची सभा जळगावलाच!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पारोळा, धरणगावला नको तर ती जळगावलाच घ्या; यावर एकमत झाले. परंतु सभेच्या ठिकाणावरून रुसवे-फुगवे बाजूला सारून एकत्रित येऊन सभा यशस्वी करण्याचा सल्ला प्रत्येक पदाधिकार्‍याने बैठकीत दिला.

उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍यासंदर्भात शनिवारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. बैठकीच्या ठिकाणावरून एकमेकांना चिमटे काढत पदाधिकार्‍यांनी भूमिका स्पष्ट केल्या. सभा जळगावलाच घ्या, असा आग्रह पदाधिकार्‍यांनी धरल्यामुळे तो निर्णय आमदार चिमणराव पाटील यांना देखील मान्य करावा लागला. राज ठाकरे यांची सभा शहरातच झाली. मुख्यमत्र्यांची सभाही जळगावलाच होणार आहे. मग उद्धव ठाकरेंचीच सभा जळगावात का नाही? असा प्रo्न उपस्थित झाला. चंद्रकांत पाटील, गजानन मालपुरे, मंगला बारी, इंदिरा पाटील उपस्थित होत्या.आमदार चिमणराव पाटील म्हणाले की, मी कामानिमित्त उद्धवसाहेबांकडे गेलो होतो. त्या वेळी साहेबांनी सभेची 5 मे ही तारीख दिली. सभा कुठे घ्यायची असे विचारले असता पारोळय़ात घ्या; असे मी त्यांना सांगितले. मात्र, त्यानंतर लागलीच जिल्हाप्रमुखांना याची कल्पना दिली आणि सभेचे स्थळ तुम्ही ठरवा, असेही सांगितले.


शिवसेनेतर्फे सह्यांची मोहीम
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुष्काळासंदर्भात केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे सह्यांची मोहीम हाती घेणार आहे. तसे आदेश संपर्कनेते विलास अवचट यांच्याकडून शनिवारी सकाळी प्राप्त झाल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. 18 एप्रिलपर्यंत सह्यांची यादी पक्ष कार्यालयाला सादर केली जाणार आहे.

आमदारांनी जबाबदारी घ्यावी

माजी आमदार गुलाबराव पाटील म्हणाले की, सभा कुठेही घ्या त्याविषयी हरकत नाही; पण पक्ष संघटनात्मक दृष्टिकोनातून सभा जळगावलाच झाली पाहिजे. सभेच्या ठिकाणावरूनच मतभेद असतील तर सभा यशस्वी होईलच कशी? चिमणराव पाटील यांनी पारोळय़ाप्रमाणेच येथील सभेची जबाबदारी घ्यावी.