आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण्यांचे गुरू होण्यापेक्षा शेतक-यांची वकिली करा - अ‍ॅड.निकम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कृषिप्रधान देशात बहुसंख्य शेतकरी असूनही त्यांच्या समस्या सोडविल्या जात नाहीत. शेतीमालाला भाव मिळत नाही, शेतीसाठी वेगळे बजेट नाही, शेतीसाठी तंत्रज्ञान उपलब्ध होऊनही समस्या कायम आहेत. तथापि, भंवरलाल जैन यांचे शेतीसाठी मोठे योगदान आहे. ते राजकीय व्यक्तींचे गुरू आहेत; मात्र राजकारण्यांचे गुरू होण्यापेक्षा त्यांनी शासनाकडे शेतक-यांची वकिली केली तर अनेक समस्या सुटतील, असा सल्ला विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांनी डॉ.भंवरलाल जैन यांना दिला.
भारत कृषक समाजाच्या ‘कृषी गौरव’ पुरस्कारांचे कृषी प्रदर्शनात रविवारी अ‍ॅड.निकम यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. शेतक-यांच्या अडचणी सुटत नसल्याने शेतीबाबत जागृती करण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्य शासन शेतक-यांप्रती एवढे उदासीन का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी स्वतंत्र कृषी बजेटची आवश्यकता विशद केली. व्यासपीठावर जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष डॉ.भंवरलाल जैन, डॉ.के.बी.पाटील, प्रकाश मानकर, वसंतराव महाजन, सुभाष नागरे, रवी लहाने, डॉ.व्यंकटराव मायंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वनाथ महाजन यांनी केले तर आभार वसंतराव महाजन यांनी मानले. या वेळी ‘सौरशक्ती’ साप्ताहिकाचे प्रकाशन करण्यात आले.
पुरस्कारार्थी - जैन इरिगेशनचे अध्यक्ष भंवरलाल जैन यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला तर चिनावल येथील शेतकरी डिगंबर नारखेडे, नागपूर येथील नानासाहेब टाले यांना ‘विशेष कृषी साह्य गट’ पुरस्कार देण्यात आले. प्रभावी कृषिविस्तार कार्य गटात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्राचार्य डॉ.व्यंकटराव मायंदे, डॉ.सुभाष टाले, डॉ.जे.व्ही.पाटील-हैद्राबाद, डॉ.प्रफुल्ल काळे-नागपूर, डॉ.के.बी.पाटील, जिल्हा दूध संघाचे एमडी रवी लहाने, जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष नागरे, पत्रकार आदिनाथ चव्हाण, राजेंद्र साठे, शेतकरी गटातून विठ्ठल माळी, स्नेहल टाले-अकोला, निर्मला पाटील, पांडुरंग पाटील, चिमण पाटील, शरद महाजन-जळगाव, हेमंत शेंद्रे, हेमंत सोनारे, रघुनाथ येडके-सांगली यांना पुरस्कार देण्यात आले.