आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उज्ज्वल ऑटोला साडेपाच लाखांचा गंडा; गुन्हा दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरापासून जवळ असलेल्या अवधान शिवारातील उज्ज्वल ऑटोमोटिव्ह कंपनीतून ट्रक खरेदी केल्यानंतर व्हॅट कर न भरणार्‍या सोलापूरच्या 12 व्यापार्‍यांविरुद्ध मोहाडी पोलिसांत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 12 जणांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे उज्ज्वल ऑटोमोटिव्हला पाच लाख 60 हजारांचा गंडा घातला आहे.

यासंदर्भात उज्ज्वल कंपनीतील कर्मचारी आनंदा भीमराव म्हस्के (40) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोलापूर व पुण्यातील रहिवासी असलेल्या संजय दशरथ पराडे, कैलास नारायण गाडेकर (रा. संगम, ता. माळशिरस, जि. सोलापूर), शंकर राजाराम काळे, संतोष शिवाजी मोरे, भरत बाबू गलांडे, हनुमंत पांडुरंग काळे (चौघे रा. नरसिंगपूर, ता. इंदापूर, जि. पुणे), तानाजी संपत जगदाळे (रा. इंदापूर), विशाल साहेबराव पवार (हिमगाव, ता. इंदापूर), अनिल संदीपन मितकल, संतोष नामदेव पराडे, (रा. बाभूळगाव, ता. माळशिरस), सुनील अभिमन पराडे (रा.संगम, ता. माळशिरस), भाऊसाहेब संदीपन पराडे (ता. माळशिरस) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संशयितांनी उज्ज्वल ऑटोमोटिव्हमधून सुमारे 12 ट्रक खरेदी केले होते. या वाहनांची केबिन व बॉडी पुणे जिल्ह्यातील नरसिंगपूर येथील पराग बॉडी बिल्डर्स व माळशिरस येथील ज्योतिर्लिंग बॉडी बिल्डर्स या दुकानातून तयार केल्याचे सांगितले. याशिवाय संबंधित दुकानांची खोटा व्हॅट क्रमांक असलेली बिलेही दिली. ही कागदपत्रे खरे असल्याचे संशयितांनी भासवले. मुळात व्हॅटचा भरणा झालाच नसल्यामुळे उज्ज्वल कंपनीला ही रक्कम भरावी लागली. यातून उज्ज्वल ऑटोमोटिव्ह व शासनाची सुमारे पाच लाख 58 हजार तीन रुपयांत फसवणूक करण्यात आली. दि. 27 एप्रिल 2011 ते आजपावेतो या काळात हा प्रकार घडला. याप्रकरणी आनंद म्हस्के यांच्या तक्रारीवरून 12 जणांविरुद्ध भादंवि कलम 420,468,471,472,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील करीत आहेत.

पोलिस जाणार सोलापूरला
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मोहाडी पोलिसांचे पथक लवकरच सोलापूर आणि पुणे येथे जाणार आहे. त्यामुळे संशयितांचे जाबजबाब घेता येऊ शकतील. यासंदर्भात वरिष्ठांच्या आदेशानंतरच पोलिस पथक रवाना होईल, अशी माहिती पोलिसांनी ‘दिव्य मराठी’ दिली आहे.