आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uncle Give Drawing Book, Sweet ; But He Never Not Come Back

काका ड्रॉइंगचे बुक, खाऊ देऊन गेले; पुन्हा आलेच नाहीत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ‘‘काकांनी आम्हाला छान छान ड्राइंगची बुक, जनरल नॉलेजची पुस्तके घेऊन दिली. ते जेव्हा आम्हाला भेटायला येतात तेव्हा काही तरी खाऊ आम्हाला द्यायचेच. दीड महिन्यापूर्वी येऊन गेले. नंतर काही आलेच नाहीत. ते का आले नाहीत?’’ अभीक्षण गृहातील लहानग्या सातवीतल्या प्रदीपने निरागसपणे प्रश्न केला आणि काळीज हेलावले. त्याचा भाऊ दत्तूही अनामिक चेहर्‍याने पाहत होता. पण त्यांना कसे समजून सांगायचे, की त्यांचा आवडता काका सय्यद झुल्फिकारअली कादरी पुन्हा कधीच येणार नाही. गुढीपाडव्याला दुपारी 3 वाजताच त्यांनी वयाच्या 42 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सय्यद झुल्फिकारअली कादरी आणि प्रदीप, दत्तू यांचं नातं धर्म, जातीच्याही पलीकडचे आहे. घराजवळ सप्टेंबर 2012 मध्ये त्यांना ही दोन निरागस बालके बेवारसपणे भटकताना आढळली. या मुलांना झुल्फिकार यांनी जवळ केले आणि ‘दिव्य मराठी’च्या मदतीने त्यांना अभीक्षणगृहात दाखल करेपर्यंत ते अधीक्षकांना सारखे म्हणायचे, इनको स्कूल में भेजना!

बेंडाळे चौकापासून राजकमल टॉकीज चौकापर्यंत असा एकही माणूस नाही जो झुल्फिकारअलींना ओळखणार नाही, असे त्यांचे मित्र वीरेंद्र शर्मा यांनी सांगितले. आजारपण अंगावर काढत होता. आईवडील आल्यावर जाईन दवाखान्यात, असे तो सारखा म्हणायचा, असे नवल चव्हाण यांनी सांगितले.
एकटेपणामुळे हट्टी
एकटेपणामुळे तो काहीसा हट्टी झाला होता. मात्र, बोलण्यात स्पष्टपणा होता. सात वर्षांत त्याने इतका लोकसंग्रह केला होता, की तो गेल्याची माहिती मिळताच तासाभरात 50-60 जण त्यांना पाहायला आले होते. आजोबांनंतर लोकसंग्रह जपणारा परिवारातला तोच एकमेव होता, असे त्यांचे मामा कफील अहेमद शेख यांनी सांगितले. बीएस्सी, सीएपर्यंत शिक्षण घेतलेले झुल्फिकार यांचे आर्किटेक्टचे शिक्षण मात्र अप्रू्ण राहिले. रोज वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन, अभ्यास त्यांचा सुरू असायचा. यात जेवणाचीही फिकीर नव्हती, असेही त्याच्या मामांनी सांगितले.

रुग्णालयात दोन तासातच सोडले प्राण
झुल्फिकारअली बेंडाळे चौकात एकटेच राहायचे. आईवडील औरंगाबादेत स्थायिक झाले आहेत. मात्र, घरात कोणाशीही त्यांचे पटत नव्हते. माझ्याकडे लक्ष देत नाही, माझी काळजी घेत नाही अशी त्यांची वडिलांकडे नेहमी तक्रार असायची. त्यामुळे दहा वर्षांपूर्वीच त्यांना सोडून आईवडील औरंगाबादमध्ये निघून गेले. त्यानंतर त्यांनी कधीही त्यांना विचारले नाही. अगदी आजारपणातही त्यांनी त्याची चौकशी केली नाही. काविळीच्या शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर दोन बहिणी त्यांना पाहण्यासाठी आल्या. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर दोन तासांतच झुल्फिकार यांनी प्राण सोडला.
मेसचे जेवण 8 वर्षांपासून
एकाकी जीवन जगणारे झुल्फिकार यांनी 8 वर्षांपासून मेस लावली होती. त्याचे पैसे वडील पाठवायचे. निर्व्यसनी आयुष्य व्यतीत करणारे झुल्फिकार नेहमी मदतीसाठी तत्पर असायचे.

माजी खासदारांचा नातू
झुल्फिकारअली कादरी हे माजी खासदार सय्यदअली वकील यांचे नातू. पण स्वत:ची ओळख सांगताना त्यांनी कधीही आजोबांची ओळख सांगितली नाही. त्यांचे चारही काका मोठय़ा पदावर आहेत. पैकी एक काका अमेरिकेत वास्तव्यास आहे. मात्र, आजोबांनंतर संपूर्ण कुटुंब लोकांमध्ये मिसळले नाहीत. झुल्फिकार अखेरच्या सात वर्षांत लोकांमध्ये मिसळले. पण ओळख अशी करून गेले, की त्यांच्या जाण्याने घरातलीच कोणी व्यक्ती आपल्याला सोडून गेल्याची भावना प्रत्येकाच्या चेहर्‍यातून उमटून गेली.