आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचो-यात तणावपूर्ण शांतता, ४७ जण ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोरा - पाचो-यात दंगलीनंतरच्या दुस-या दिवशी शुक्रवारी तणावपूर्ण शांतता होती. बाजारपेठेतील दुकाने पूर्णपणे उघडली नाही. एक हजार दंगेलखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ४७ जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, दंगलप्रकरणी दोषी असलेल्यांना तडीपार करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहेत.

दोन गटातील वादानंतर गुरुवारी पाचो-यात चार तास दंगल भडकली होती. पाच वाहनांची जाळपोळ करून आमदार किशोर पाटील यांच्या वाहनावरही दगडफेक झाली होती. यात दोन पोलिस अधिकारी, चार पोलिस कर्मचा-यांसह दोन्ही गटातील आठ जण जखमी झाले होते. जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी शहरातील तणावग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. दंगलीत नुकसान झालेल्या नागरिकांना आर्थिक मदतीची घोषणाही केली.

धरपकड सुरू, काही संशयित फरार
शुक्रवारी सकाळी तणावपूर्ण शांतता हाेती. त्यामुळे दुपारी बारा वाजले तरी बाजारपेठ पूर्णपणे उघडलेली दिसत नव्हती. जी दुकाने सुरू होती, तेथे ग्राहक बोटावर मोजण्याइतके होेते. चौकाचौकात पोलिस बंदोबस्त कायम होता. दंगा नियंत्रण पथकाची गस्त सुरू होती. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण होते. दरम्यान, पाेलिसांनी दंगल घडवणा-या १००० समाजकंटकांवर गुन्हे दाखल केले. यापैकी ४७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांचे धरपकड सत्र सुरू असून शहरातून पळून गेलेल्या युवकांच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे.