आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगारी: 3 लाख युवकांना नोकरीची प्रतीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्ह्यातील तब्बल तीन लाख १८ हजार ५४ उमेदवार शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात दहावीपासून ते आयटीआय, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, कायदा या विषयांतील पदवीधरांचा समावेश आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हा रोजगार कौशल्य विकास कार्यालयाकडे नोंदणी केलेली आहे; अशी परिस्थिती असतानाही उद्योजकतेकडे वळणाऱ्यांची संख्या तुलनेत अतिशय नगण्य आहे. स्वत:चा उद्योग, व्यवसाय करण्यासाठी धडपडणाऱ्या केवळ ८४ जणांनी जिल्हा उद्योग केंद्राकडे नोंदणीसाठी अर्ज केले आहेत.

समाजात शासकीय नोकरीला अवास्तव महत्त्व आले आहे. शासकीय नोकरी मिळाल्यास खासगी नोकरीला प्राधान्य देण्यात येत आहे. शासकीयबरोबर खासगी उद्योगांमध्येही नोकरी करण्यासाठी आता रोजगार कौशल्य विकास कार्यालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, सर्वांनाच नोकऱ्या देणे शासनाला शक्य नाही. त्यामुळे शासनाने उद्योग, व्यवसाय करण्यासाठी अनेक सवलतीच्या योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये प्रधानमंत्री मुद्रा बँकेसारखी विनातारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सेंट्रल बँकेतर्फे आतापर्यंत ३०० जणांना उद्योगांसाठी कर्जवाटप करण्यात आले आहे. इतरही राष्ट्रीयकृत बँकांकडूनही कर्ज वितरण सुरू आहे. जिल्हा उद्योग केंद्रात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी वर्षभरात ८४ जणांनी अर्ज केले आहेत. त्यात ७२ सूक्ष्म १२ लघुउद्योग सुरू करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. एकंदरीत बेरोजगारांची संख्या तीन लाखांवर असली तरी उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. शासकीय नोकरी मिळवण्यासाठी असलेली वयाची अट संपेपर्यंत उमेदवार प्रयत्न करीत राहतात.