आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारनियमनाच्या काळात 1500 घरांना अखंड वीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ऑक्टोबर हिटच्या उकाड्यात दहा तासांपर्यंत पोहचलेल्या भारनियमनामुळे लाखो जळगावकर जनता होरपळून निघत आहे. याच स्थितीत मात्र एक्सप्रेस फीडरवरील १५०० ग्राहक २४ तास विजेचा उपभोग घेत आहेत. उद्योगांसाठी ही सुविधा असताना या भागात घरगुती सोसायट्या, महावितरणसह विविध शासकीय कार्यालयांचाच अधिक सहभाग आहे. परिणामी या भागाकडे रहिवासाचे प्रमाण अधिक वाढले असल्याची स्थिती आहे. मात्र, ही वीज शहरातील अन्य भागात वळवल्यास काही प्रमाणात भारनियमन कमी करता येणे शक्य हाेणार आहे. 
 
शहरातील औद्याेगिक वसाहत असलेल्या भागात शासनाच्या आदेशाप्रमाणे एक्सप्रेस फीडरवरुन वीजपुरवठा केला जात आहे. एमआयडीसीसह मेहरुणचा काही भाग या अंतर्गत येतो. या भागात दररोज ३६.७३ मेगावॅटचा वीजपुरवठा केला जातो. या एक्सप्रेस फीडर अंतर्गत १७ फीडर आहेत. या भागात जवळपास हजार औद्याेगिक ग्राहक असुन लहान दुकानदार, व्यावसायिकांसह अनेक घरगुती वीज ग्राहकांची संख्याही एक हजारावर असल्याची माहिती महावितरणच्या जनसंपर्क विभागाने दिली अाहे. 

महावितरण कंपनीचे प्रशस्त कार्यालय, वीज कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, किरकोळ व्यावसायिकांची दुकाने देखील याच भागात असून येथे २४ तास वीजपुरवठा सुरु अाहे. या एक्सप्रेस फीडरवरील परिसर भारनियमनातून वगळला आहे. या फीडरवर दुरुस्ती अथवा अचानक बिघाड झाल्यावरच या भागात वीजपुरवठा खंडित होतो. 

या क्षेत्रात महावितरणचे परिमंडळ कार्यालयही आहे. तर कर्मचाऱ्यांची निवासस्थाने देखील आहेत. तर अयोध्यानगर, मेहरुणमधील काही भाग तसेच गृहकुल हौसिंग सोसायटी, रेमंड कॉलनीचा परिसर देखील याच भागात जाेडला आहे. सुरळीत वीजेमुळे या घरांमध्ये वातानुकूलित यंत्राच्या वापरासह वीजेचा अपव्ययही अधिक हाेत आहे. वीजटंचाईच्या काळात एक्सप्रेस फीडर या भागासाठी वरदान ठरले अाहे. 
 
अाजच यात बदल शक्य नाही 
एक्सप्रेस फीडरवरुन औद्याेगिक क्षेत्रासाठी वीजपुरवठा केला जात आहे. या भागात काहि रहिवासी क्षेत्र देखील येते. अनेक वर्षांपासून या भागात अशीच रचना आहे. यात आजतरी बदल शक्य नाही. 
- दतात्रय बनसोडे, अधीक्षक अभियंता, महावितरण 

एक्स्प्रेस फीडर 
रायसोनीफीडर, ड्रायडंट, भारत फोर्ज, भारत पेट्रोलियम, गीतांजली, स्ट्रेम फ्लो, बालाजी, सत्यम, अल्फा, रुबी, किरण पाइप, महालक्ष्मी, विनले, एमआयडीसी, इंडस्ट्रियल असे ११ केव्हीचे हे फीडर आहेत. 
बातम्या आणखी आहेत...