आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोहल्यावर चढतानाही मराठी नाटकावरील प्रेम कायम!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - लग्नपत्रिकेतून नाट्यछटांची ओळख करून देण्याचा प्रयत्न भुसावळचे पराग खराटे यांनी केला आहे. येत्या 29 नोव्हेंबर रोजी ते बोहल्यावर चढणार आहेत. यानिमित्ताने त्यांनी आप्तेष्टांना निमंत्रण देण्यासाठी ‘लग्नबंबाळ’ या शिर्षकाखाली नाट्याविष्काराची उधळण करणार्‍या लग्नपत्रिकांचे वाटप केले आहे.

लग्नपत्रिकेतील सर्व मजकूर हा नाटकाच्या भाषाशैलीत असल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. पराग खराटे हे ‘जय गणेश फाउंडेशन’चे संस्थापक सदस्य आहेत. ते सध्या आयडीबीआय बॅँकेच्या नवी मुंबई शाखेत सहायक व्यवस्थापक म्हणून सेवारत आहेत. महाराष्ट्र हिंदी परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. मधु खराटे व प्राध्यापिका सुधा खराटे यांचे ते सुपुत्र आहेत. टिपिकल लग्नपत्रिकांमध्ये शुभविवाह असा शब्द वापरला जातो. मात्र, या पत्रिकेला त्यांनी लग्नबंबाळ असे नाव दिले आहे. पत्रिकेच्या मुखपृष्ठावरील काटरूनसदृश छायाचित्रे अन् तपकिरी रंगाचा पडदा हा रंगमंचाच्या रचनेची ओळख करून देणारे आहेत. विशेष सहाय्य या प्रकारात त्यांनी ‘जय गणेश फाउंडेशन’ व आयडीबीआय बॅँकेचा नामोल्लेख केला आहे.

विवाह नव्हे नाट्यप्रयोग
‘जय गणेश फाउंडेशन’चे सदस्य तथा नाट्यवेडे पराग खराटे यांनी विवाहाच्या तिथीला नाट्यप्रयोग तर विवाहस्थळाचे नाट्यगृह असे नामाभिधान केले आहे. पत्रिकेवरील ‘लग्नबंबाळ या नाटकातील सर्व घटना व पात्र वास्तविक आहेत. त्यांचा काल्पनिक जीवनाशी काहीही संबंध नाही. जर असा काही संबंध आढळल्यास तो एक निव्वळ योगायोग समजावा’ हा मजूकरही अतिशय बोलका आहे.

पिवळी तालीम
हळदीच्या मुहूर्ताला पिवळी तालिम असे नाव दिले आहे. नेपथ्य, रंगभूषा, वेषभूषा, निर्मिती, दिग्दर्शन, लेखन, संकल्पना, सूत्रधार, संगीत, ध्वनी व प्रकाश योजना, तंत्र सहाय्य अशी नाटकाची अंगे आहेत. त्याचा आधार घेऊन प्रत्येक घटकांत त्यांनी नातेवाइकांची नावे टाकून धमाल उडवून दिली आहे.

‘वपुर्झा’चा बोलका संदेश
खराटे यांच्यावर कथाकथनकार व. पु. काळे यांच्या साहित्याचा पगडा आहे. म्हणूनच त्यांनी लग्नबंबाळ पत्रिकेच्या मलपृष्ठावर ‘वपुर्झा’ पुस्तकातील बोलका संदेश मांडला आहे. त्यातील ‘संसार या शब्दाबरोबरच संघर्ष हा आलाच. संघर्ष नेहमी दुसर्‍या माणसाबरोबरच असतो, असं नाही. नको वाटणारा निर्णय घेण्याची पाळी स्वत:वरच आली की, स्वत:शीच संघर्ष सुरू होतो. संसारात या संघर्षाचं खापर फोडण्यासाठी जोडीदार मिळतो इतकचं’ या ओळी अंतर्मुख करणार्‍या आहेत.