आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • University Budget : 1292.95 Lakh Defecit Budget Sanction

विद्यापीठाचा अर्थसंकल्प : 1292.95 लाख तुटीचा अर्थसंकल्प मंजूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - संशोधन, बालवैज्ञानिक पुरस्कार, महिला स्वच्छतागृह अनुदान योजना, विद्यापीठ विकास, उमवि उत्तम विद्यानगरी आणि शिक्षकेतर संशोधन प्रोत्साहन योजनेसह नव्या योजनांचा समावेश असलेला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा सन 2013-14चा अर्थसंकल्प शनिवारी सादर करण्यात आला. एकूण 1292.95 लाखांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प असून, त्याला अधिसभेत मंजुरी देण्यात आली. अर्थसंकल्प समितीचे अध्यक्ष डॉ.अरविंद चौधरी यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर करताना तो विकासाकडे नेणारा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

या वेळी कुलगुरू डॉ.सुधीर मेर्शाम, कुलसचिव डॉ.ए.एम.महाजन, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ.दिलीप हुंडीवाले, अधिसभा सदस्य आदी उपस्थित होते. अर्थसंकल्पात जमा होणार्‍या रकमेचा अंदाज 15039.51, तर खर्च 16332.46 लाख दर्शवण्यात आला आहे. संशोधन, बालवैज्ञानिक पुरस्कार, महिला स्वच्छतागृह अनुदान योजना, विद्यापीठ विकास, उमवि उत्तम विद्यानगरी आणि शिक्षकेतर संशोधन प्रोत्साहन योजना या ठळक योजना यंदा नव्याने आखण्यात आल्या असून, त्यासाठी मोठय़ा प्रमाणात या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
विद्यार्थी विविध उपक्रम तरतुदीत वाढ
उपक्रम पूर्वीची तरतूद आताची तरतूद
कमवा व शिका 60 लाख 70 लाख
युवारंग महोत्सव 12 लाख 16 लाख
एकलव्य विद्याधन योजना 12.60 लाख 16 लाख
विद्यार्थी सुरक्षा योजना 7 लाख 15 लाख
क्रीडा सामने 12 लाख 15 लाख
विद्यार्थी शिष्यवृत्ती 190 लाख 250 लाख
इतर योजनांच्या तरतुदीतही वाढ
या अर्थसंकल्पात शिक्षकेतर कर्मचारी संशोधन प्रोत्साहन योजना यंदा वाढवण्यात आली असून, त्यासाठी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय प्रस्तावित योजनांमध्ये विदेशी भाषा पाठय़क्रम, डिजिटल नॉलेज सेंटर, सायंकालीन एक्झिक्युटिव्ह एमबीए पाठय़क्रम, माहिती व तंत्रज्ञान जागृती अभियान, उमवि बांधकाम मजूर-पाल्य कल्याण योजना, अनुसूचित जाती विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, भारतीय तत्त्वज्ञान परिचय अभ्यासक्रम, विशेष अतिथिगृह विस्तार, जीवशास्त्र प्रशाळा, संगणकशास्त्र प्रशाळा, कॉमन फॅसिलिटी सेंटर, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, प्रशिक्षण व नियुक्ती कक्ष, आदिवासी शैक्षणिक केंद्र, जलशुद्धीकरण योजना, विकलांग पाल्य बिनव्याजी कर्ज, राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धा, विद्यार्थी भवन आदी गोष्टींसाठीही तरतूद करण्यात आली आहे. या योजना प्रस्तावित असल्या तरी विद्यार्थी आणि विद्यापीठाच्या हिताच्या योजना आहेत. त्यामुळे यात भरीव तरतूद करण्यात आली आहे.
विकासासाठीही तरतूद
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ अनुदान आयोगाने 12वी पंचवार्षिक योजना लागू केली आहे. त्यानुसार विद्यापीठ विकासाच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण तरतुदी या अर्थसंकल्पात आहेत. त्यात जीवशास्त्र, गणित, संगणकशास्त्र इमारत बांधकामासाठी 3 कोटी, विर्शामगृह विस्तार 25 लाख, उमवि उत्तम विद्यानगरी 2.5 कोटी, परिसर सुशोभिकरणासाठी 40 लाख, पाणीपुरवठा योजनेसाठी 10 लाख, संरक्षक भिंत उभारणीसाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
बालवैज्ञानिक पुरस्कार योजना
खान्देशातील शालेयस्तरावर संशोधनात विशेष रुची घेणार्‍या बालवैज्ञानिकांच्या योगदानाबद्दल त्यांना प्रोत्साहन देणारी ही योजना आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांतून जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय अशा तीन संशोधक विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
कर्मचार्‍यांना सोयींयुक्त निवासस्थाने
कर्मचार्‍यांना सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवासस्थाने विद्यापीठाजवळ उपलब्ध व्हावीत, यासाठीही तरतूद करण्यात आली आहे. ही निवासस्थाने 2 बेड, हॉल, किचनने युक्त असतील. या योजनेंतर्गत 64 निवासस्थाने प्रस्तावित असून, त्यासाठी अंदाजे 9 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अर्थसंकल्पात 2.5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
संशोधनावर भर
विद्यार्थी व शिक्षकांच्या संशोधनावर विशेष भर देत यंदा त्यासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यात कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजनेसाठी 100 लाख, कुलगुरू विद्यार्थी संशोधन प्रोत्साहन योजना- 15 लाख, आविष्कार संशोधन शिष्यवृत्ती- 100 लाख, रायसोनी संशोधन शिष्यवृत्ती- 2.50 लाख, शिक्षकेतर कर्मचारी संशोधन प्रोत्साहन योजना- 10 लाख आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदा आयोजनासाठी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षकेत्तर कर्मचारी संशोधनासाठी यंदा प्रथमच विचार करण्यात आला आहे.
महिलांसाठी स्वच्छतागृह
महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र व सर्व सोयींयुक्त असे महिला स्वच्छतागृह बांधकाम अथवा दुरुस्तीसाठी महाविद्यालय सुविधा योजनेंतर्गत अनुदान देणारी ही योजना आहे. एका महाविद्यालयास जास्तीत जास्त 40 हजार रुपये बिनव्याजी रक्कम अनुदान स्वरुपात देण्यात येईल. अर्थसंकल्पात 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 50 महाविद्यालयांना सुविधेचा लाभ देण्यात येईल.