जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बांधण्यात आलेल्या डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी भवन उत्तम विद्यानगरी कर्मचारी वसाहतीचे उद्घाटन पाच गावांना संगणक वाटपाचा कार्यक्रम २० जून रोजी होणार अाहे. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना निमंत्रण दिले अाहे. मात्र, जलसंपदामंत्र्यासह जिल्ह्यातील भाजपचे सहा आमदार, दोन खासदार यांच्या नावांचा साधा उल्लेखही पत्रिकेत केलेला नाही.
अामदार एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. असे असताना विद्यापीठाने जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना डावलून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना निमंत्रण दिले अाहे. तर राज्यसभा सदस्य रामदास आठवले, राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील, शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांची नावे प्रमुख पाहुण्यांमध्ये आहेत. या प्रकारामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या अाहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दूर ठेवण्यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहे.सन १९९० मध्ये पवार यांच्या हस्ते उमविच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन झाले हाेते. त्यानंतर एकदा पदवीप्रदान सोहळ्यासाठी पवार विद्यापीठात आले होते. आता मोठ्या अंतराने ते पुन्हा उमवित येत अाहेत.
‘ते’बोलावूनही येत नाहीत
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उमविच्या कर्मचारी वसाहतीच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, सुरुवातीला होकार दिल्यानंतरही ऐन कार्यक्रमाच्या दिवशी त्यांनी विद्यापीठात येण्याचे टाळले होते. त्यामुळे भाजपचे आमदार, खासदार यांनीदेखील आले नाही.
तर भुसावळचे प्रा. सुनील नेवे यांनी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजकीय जीवनावर पीएच.डी. केल्यानंतर त्यांच्या ताेंडी परीक्षेला (व्हायवाला) भाजपचे खासदार, आमदार जातीने विद्यापीठात हजर राहिले होते. भाजपच्या मंडळींना बोलावल्यानंतर देखील ते विद्यापीठातील कार्यक्रमांना हजर राहत नाहीत, अशी चर्चा विद्यापीठात तेंव्हापासूनच सुरू आहे.
यापूर्वीअाले नाही म्हणून अाता निमंत्रण नाही
यापूर्वी झालेल्या अनेक माेठ्या कार्यक्रमांना, पदवीप्रदान सोहळ्यांवेळी जिल्ह्यातील भाजपचे मंत्री, आमदार, खासदारांना निमंत्रणे दिली होती. मात्र, एकदाही ते आले नाही. त्यामुळे आता त्यांना निमंत्रण दिलेले नाही.
- प्रा.डाॅ.सुधीर मेश्राम, कुलगुरू,उमवि