आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जलप्रलयाच्या एका वर्षानंतरही भाविकांच्या मनात भय कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘खरोखरचा स्वर्ग तर आम्ही बघितला नाही, मात्र केदारनाथाचे दर्शन घेतल्यानंतर हाच धरतीवरील स्वर्ग असावा’ असा अनुभव शहरातील केदारनाथाचे दर्शन घेऊन परतलेल्या भाविकांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला. मात्र, गेल्या वर्षी 16 जूनला आलेल्या जलप्रलयानंतर आजही केदारनाथाचे दर्शन घेणार्‍यांची संख्या नगण्य असल्याने भाविकांच्या मनातील भय कायम असल्याचे चित्र त्यांना दिसले. राज्यातून प्रथम दर्शन घेण्याचा मानदेखील जळगावातील भाविकांना मिळाला आहे.
पंचवीस वर्षांपासून नियमित दर्शन
कडगाव येथील शोभा पाटील या केदारनाथाच्या दर्शनाला दरवर्षी जातात. शहरातील 20 ते 25 भाविकांना सोबत एकत्र करून तसेच बस बुक करून केदारनाथ दर्शनाला जातो. या वेळी या भाविकांना हिमालयातील 1 हजार 500 किलोमीटरच्या परिसरातील केदारनाथ, गंगोत्री, जमनोेत्री, बद्रीनाथाचे दर्शन घेऊन परतायला 25 दिवस लागले. केदारनाथ मंदिरात या वेळी फक्त पुजारीच पाहण्यास मिळाले त्यावरून भाविकांची संख्या रोडावल्याचाही अनुभव त्यांना आला. गौरीकुंडापासून पायी चालत केदारनाथाला जाताना रस्त्यात अनेक ठिकाणी मानवी शरीराच्या हाडांचे सापळे तसेच पडल्याचे धक्कादायक चित्रही या भाविकांनी बघितले.
लष्करी जवानांनी केली मदत
केदारनाथला जाताना एका बाजूने 22 किमी चालत जावे लागले. पूर्वीचे रस्ते वाहून गेल्याने दोन्ही बाजूंनी दरी असलेले रस्ते सध्या शिल्लक आहेत. रस्त्यात केवळ लष्करी जवानांचे तंबू लागलेले होते. सकाळी 7 वाजेला निघाल्यानंतर सायंकाळी 5 वाजेला पोहोचून दर्शन घेतल्यानंतर लष्करी जवानांनी जळगावच्या भाविकांची राहण्याची आणि जेवणाची सोय केली.
एकदा तरी यात्रा करावी
प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी केदारनाथाची यात्रा केली पाहिजे. गेल्या वर्षी आलेल्या जलप्रलयामुळे यंदा भाविकांची संख्या कमी होती.
- संजय इंगळे, वाघनगर

उत्तराखंड सरकारची मदत

४केदारनाथाचे दर्शन घेण्यासाठी जाताना रस्त्यात पूर्वीप्रमाणे हॉटेल नाही. त्यामुळे उत्तराखंड सरकारने रस्त्यात पाणी, चहा, नाश्ता व जेवणाची सुविधा केली आहे. पूर्वीच्या रस्त्यापेक्षा 10 किमी रस्ता सध्या सुरू आहे. अनेक ठिकाणी मृतांचे सांगाडे पडलेले आहेत.
सोनाली खडके, जुने जळगाव
फोटो - केदारनाथाचे दर्शन घेण्यासाठी वैष्णवी सागर इंगळे (वय 5), राज देवेंद्र खडके (वय 8) दोघे चिमुकल्यांसह सुरेश काशिनाथ चौधरी या अपंग भाविकाचाही समावेश होता.