आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुभव : क्षणात झाले सगळे सौंदर्य उद्ध्वस्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - निसर्गाचे सौंदर्य कसे असते आणि रौद्र रूपही किती भयानक असते हे प्रत्यक्षात डोळ्यांनी जेव्हा माणूस पाहतो तेव्हा त्याचा पैसा, र्शीमंती, गरिबी सगळे बाजूला राहते. अशा वेळी दिसते फक्त संपणारे आयुष्य. दोन तासापूर्वी जे सौंदर्य पाहिले होते ते काही क्षणातच उद्ध्वस्त झाले. हा प्रसंग अंगावर शहारे आणणारा होता. असा अनुभव उत्तराखंडचा जलप्रलय डोळ्यादेखत पाहून परतलेले जळगावातील राजेंद्र व ऊर्मिला अग्रवाल यांनी ‘दिव्य मराठी’जवळ कथन केला.

संगम ट्रॅव्हल्ससह मुंबईहून 80 यात्रेकरुंचा ग्रुप गेला होता. यातील अग्रवाल दांपत्य हे शुक्रवारी रात्री दिल्लीहून औरंगाबाद येथे विमानाने व इतर जण शनिवारी रात्री रेल्वेने सुखरूप परतले. या यात्रेकरूंचे त्यांच्या परिवारातर्फे स्वागत केले. या वेळी त्यांनी विविध अनुभव सांगितले.

गाड्यांसह पार्किंग उद्ध्वस्त
केदारनाथचे दर्शन घेऊन बद्रिनाथकडे प्रस्थान केले. मात्र, बद्रिनाथच्या पायथ्याजवळच रस्ता बंद झाला होता. तेथे 24 तास थांबल्यानंतर परत येण्याचा निर्णय घेतला गेला. परत येताना निसर्गाने केलेली हानी दृष्टीस पडली. अवघ्या काही तासातच चित्र पालटले होते. काही तास अगोदर पाहिलेली पाच किलोमीटरची गाड्यांनी गच्च भरलेली केदारनाथची पार्किंग पूर्णत: उद्ध्वस्त झाली होती. तेथे फक्त माती आणि दगडच दिसत होते. घरी परत येऊ की नाही याचा विश्वास नव्हता. डोळे बंद केले आणि देवाचा जप करत आलो. दोन ते तीन दिवस आम्ही एकाच ठिकाणी फक्त बसून होतो. ऊर्मिला अग्रवाल

मृत्यू समोर पाहिला
रस्त्यावर अडकून पडलो असताना पुढे जायचा प्रय} करीत होतो. तेव्हा आमच्या समोर पुढील बस पाण्यात गेली. तो क्षण पाहताना मन हेलावून गेले. आता करणार काय, आपण घरी पोहचणारच नाही या विचाराने हादरून गेलो. पण सर्व यात्रेकरुंनी आणि बस ड्रायव्हरने हिंमत करीत बाजूला पडलेले लोखंडी रडार तेथे लावले. परंतु त्यावरून जाणे कठीण होते. जराही चूक झाली म्हणजे दरीत जाऊन पाण्यात मृत्यूच झाला असता. तरीही धीर धरला देवाचे नाव घेतले आणि ड्रायव्हरने बस नेली. आम्ही सगळे नंतर त्या रडारला धरत हळूहळू जीव मुठीत घेऊन मृत्यूच्या प्रलयातून बाहेर पडलो. अन्न ताटात होते पण एक घास पोटात गेला नाही.
राजेंद्र अग्रवाल