आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा पिवळे दुर्गंधीयुक्त पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरात तीन-चार दिवसांपासून पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. दोन दिवसानंतर होणारा पाणीपुरवठा दूषित होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, तापमान वाढल्याने धरणातील पाण्याच्या घटकांत बदल झाल्याने महिनाभर पिवळे पाणी येण्याची शक्यता आहे.
शहराला वाघूर धरणातून पाणीपुरवठा होतो; परंतु गेल्या तीन-चार दिवसांपासून पिवळ्या रंगाचा पाणीपुरवठा होत आहे. तसेच तीन दिवसांपूर्वी फिकट पिवळा असलेला रंग गर्द होत चालला असून, पाण्याला दुर्गंधीही येत आहे. तथापि, यासंदर्भात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांना कल्पनाही नसल्याची स्थिती आहे. सहा महिन्यांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात अशाच प्रकारचा पिवळसर पाणीपुरवठा झाला होता. त्या वेळी लोहाचे प्रमाण वाढल्याचे कारण पुढे आले होते. मात्र, जलशुद्धीकरण केंद्रातील अधिकार्‍यांच्या बदल्या करताच पिवळे पाणी येणे बंद झाले होते. आता आठवडाभरापासून पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असतानाही पालिकेच्या यंत्रणेने पाणीपुरवठा विभागप्रमुख किंवा जलशुद्धीकरण केंद्रप्रमुखांना याची माहिती दिलेली नाही. उष्णता वाढल्याने पाण्यात हे बदल होत असून, मेअखेरपर्यंत हीच स्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.