आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपराष्ट्रपतींसाठी शहरभर नाकाबंदी, पाऊण तास उन्हात ताटकळत राहिले नागरिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभासाठी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी मंगळवारी शहरात आले होते. त्यासाठी सोमवारपासूनच ते ज्या महामार्ग रस्त्यावरून जाणार होते. त्या मार्गावर लाकडी बॅरेकेटिंग लावण्यात आले होते तर आकाशवाणी चौक ते अजिंठा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तब्बल दोन वेळा सुमारे एक तास रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना रणरणत्या उन्हात रस्त्यावर ताटकळत उभे लागले. यामुळे नागरिक संतप्त झाले होते.

उपराष्ट्रपती ही व्यक्ती अति महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक असल्याने त्यांच्या वाहनांचा ताफा ज्या मार्गाने जाईल ते मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवावेत असा नियम आहे. तसेच त्या मार्गाच्या दुतर्फा लाकडी बांबू व दांड्या लावून बॅरेकेटिंग लावण्यात येतात. त्यानुसार मंगळवारी कुसुंबा परिसरातील नाक्यापासून ते थेट अजिंठा विर्शामगृहापर्यंतच्या रस्त्यावर पोलिसांनी बॅरेकेटिंग लावून रस्ता बंद केला होते.

दुपारी 1 वाजता आगमन

उपराष्ट्रपतीचे मंगळवारी दुपारी 1 वाजता विशेष विमानाने विमानळावर आगमन झाले. तेथून ते अजिंठा विर्शामगृहात जाणार असल्याने अर्धा तास पूर्वीच कुसुंबा विमानतळ ते अजिंठा विर्शामगृहाचा रस्ता बंद करण्यात आला होता. तसेच राष्ट्रीय महामार्गावर विद्युत कॉलनी, शिव कॉलनी, गणेश कॉलनी या भागाकडून महामार्गाला जोडणार्‍या रस्त्यांवरदेखील बॅरेकेटिंग लावण्यात आल्यामुळे हे मार्ग बंद झाले होते. परिणामी नागरिकांना पाऊण तास रणरणत्या उन्हात ताटकळत उभे रहावे लागले. तसेच नागरिकांना शहरात येण्यासाठी फार मोठे अंतर पार करून यावे लागले.