जळगाव- जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी देवाकडे प्रार्थना म्हणून महिलांनी गुरुवारी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा केली. आजच्या आधुनिक युगातही पारंपरिक पद्धतीने महिला ही पूजा करताना दिसतात. लाइफ स्टाइल कितीही हायटेक असली तरी पूजा करताना संस्कृतीशी नाळ जुळलेली असते. शहरातील विविध भागात जागोजागी सामूहिकरीत्या ही पूजा करण्यात आली. त्याचप्रमाणे जुन्या मंदिरातही ही पूजा केली गेली. राम मंदिराजवळ, जुने जळगाव परिसर, गणेश कॉलनी, श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, ओंकारेश्वर मंदिर यासारख्या ठिकाणी अनेक महिलांनी एकत्र येऊन पूजा केली. गूळ आणि डाळ यांचा नैवेद्य दाखवला. घरोघरी आंब्याचा रस आणि पुरण पोळीचा स्वयंपाक करून त्याचाही नैवेद्य दिला गेला.
महिलांनी पूजेनिमित्त सार्जशृंगार करीत नटून-थटून आनंद साजरा केला. यात अनेक जणींनी नऊवारी पातळ नेसून नथ घालून पारंपरिक वेशात पूजा केली. वडाच्या झाडाला धागा गुंडाळत सात जन्माच्या सात फेर्या घेतल्या. जेथे वडाचे झाड उपलब्ध नव्हते, अशा ठिकाणी महिलांनी वडाच्या फांद्यांवरच समाधान मानून पूजा केली.