आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृपक्षामुळे भाज्यांना मागणी; दरात दुप्पट वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- पितृपक्षात ज्या दिवशी श्राद्ध असेल त्या दिवशी वेगवेगळ्या १२ प्रकारच्या भाज्यांची एकत्रित एक भाजी केली जाते. या १२ भाज्यांची ६० ते ८० रुपये किलोने विक्री होत असून, इतर भाज्यांच्या दरापेक्षा हे दर दुप्पट असल्याची स्थिती आहे. 
 
गणेशोत्सवानंतर पितृपक्षाला प्रारंभ झाला आहे. भाद्रपद महिन्यातील पहिले १५ दिवस पितृपक्ष असतो. या कालावधीत मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी श्राद्ध केले जाते. पितृपक्षात श्राद्ध करण्यास मोठे महत्त्व असते. त्यामुळे या दिवसांत घरोघरी तिथीनुसार श्राद्ध होते. श्राद्धाच्या दिवशी पंचपक्वान्नाचे भाेजन केले जाते. त्याचबरोबर विविध प्रकारच्या १२ भाज्यांची एकत्रित एक भाजी केली जाते. त्याला वाणवाणाची भाजी असेही म्हणतात. पितृपक्षामुळे या भाजीला असलेल्या मागणीत गेल्या सात दिवसांपासून वाढ झाली आहे. शहरातील पाचकंदील, देवपूर दत्त मंदिर, कुमारनगर, यशवंतनगर आदी भागातील भाजी विक्रेते १२ प्रकारच्या भाज्या एकत्र करून तिची किलोप्रमाणे विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत. 
 
या भाज्यांची ६० ते ८० रुपये किलोने विक्री होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. या भाजीला आठ ते दहा दिवस मागणी असेल असेही सांगण्यात आले. इतर भाज्यांचे दर आवाक्यात आहेत. 
 
या भाज्यांचा समावेश 
वाणवाणाच्या भाज्यांमध्ये दुधी भोपळा, गंगाफळ, भेंडी, चवळी, गवार, दाेडके, गिलके, कारले, काकडी, चाकी, काेबी अादी भाज्यांचा समावेश असताे. श्राद्धाच्या दिवशी या सर्व भाज्यांची एकत्रित एक भाजी करण्यासह भजी, वडा, खीर, कडी, वरणभात, पाेळी अादी पदार्थ केले जातात. दर्पण पिंडदान करण्यात येऊन त्यानंतर कावघास घातला जातो. 
बातम्या आणखी आहेत...