आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाईमुळे नाशिक, पुण्यातून येतोय जळगावात भाजीपाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- उशिरा सुरू झालेला पावसाळा त्यात शेतकर्‍यांनी पालेभाज्यांकडे पाठ फिरविल्याने भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे नाशिक व पुणे येथून मोठय़ा प्रमाणात माल जळगावच्या बाजारात दाखल होत आहे. लिलावातील भाव आणि ग्राहकांना द्यावा लागणारा भाव यात मोठय़ा प्रमाणात तफावत निर्माण होत असल्याने सद्या किचनमधून भाजीपाल्याचा ‘भाव’ कमी झाला आहे. नागरिक महागाईने भरडला जात आहे. दररोजच्या वापरात येणार्‍या अन्नधान्य व भाजीपाल्याच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे गृहिणींची चांगलीच कोंडी होत आहे. त्यामुळे घराघरात भाजीपाल्याऐवजी डाळींना महत्त्व प्राप्त झाले आहे. सद्या जळगाव तालुक्याचा विचार केला तर पूर्वीच्या तुलनेत यंदा भाजीपाल्याची लागवड अत्यंत कमी झाली आहे. याला उशिरा पावसाचे कारण सांगितले जातेय. त्यामुळे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारा भाजीपाल्याचा माल हा नाशिक व पुणे येथून येत आहे. त्याचा परिणाम वाहतूक व मागणी लक्षात घेता दरातही प्रचंड वाढ झाली आहे.
गंगाफळ 12 रुपयानी महाग
कमी पावसामुळे यंदा गंगाफळचे उत्पादन निम्म्यापेक्षा कमी झाले आहे. त्यामुळे मार्केटमध्ये 7 ते 8 रुपये किलोदराने मिळणार्‍या गंगाफळचे भाव चांगलेच वाढले आहेत. त्यामुळे गंगाफळची लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना चांगला आर्थिक फायदा होणार आहे. सध्या 20 रुपये किलोचा भाव मिळत आहे.
नफ्यासाठी दरात केली जाते वाढ
सध्या मालाची आवक कमी आहे. त्यात पावसाळा सुरू असल्याने बर्‍याच प्रमाणात मालाची नासाडी होते. या स्थितीत खर्च काढून पुरेसा नफा मिळवण्यासाठी लिलावातून खरेदी केलेल्या मालाची विक्री 15 ते 20 रुपये वाढीव दराने विक्री होत आहे. त्यामुळे ग्राहकांना 20 ते 25 रुपयांत पावभर भाजीपाला खरेदी करावा लागतोय.