आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vehicle Cleaning In Deep Nagar Plant In Bhusaval

दीपनगर प्रकल्पात खासगी वाहने धुण्यासाठी पाण्याची नासाडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - राज्यभरातील वीजनिर्मिती केंद्रांवर पाणीटंचाईमुळे संच बंद करण्याची वेळ आली आहे. दीपनगर केंद्रात मात्र अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे थेट खासगी चारचाकी वाहने धुण्यासाठी पाण्याची नासाडी होत असून, राख झाडून स्वच्छ करण्याऐवजी पाणी मारण्याचा अजब फंडा वापरला जात आहे.

दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या विस्तारित प्रकल्पात सध्या पाण्याचा अनाठायी वापर सुरू आहे. शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ‘टेक्प्रो’ कंपनीच्या एका खासगी कंत्राटदाराचे चारचाकी वाहन प्रेशरच्या पाण्याने स्वच्छ करण्यात आले. विस्तारित केंद्रात लावलेल्या सर्व वाहनांवर राख उडते. मात्र, काही कंत्राटदार आपल्या कर्मचा-यांकडून प्रेशरने पाणी मारून वाहने धुऊन घेतात. दुसरीकडे संच क्रमांक चार आणि पाचमधून उडणारी राख झाडूच्या साह्याने स्वच्छ करण्यासाठी लाखो रुपयांचे कंत्राट दिले जाते. मात्र, येथेही कंत्राटदार प्रेशरने पाणी मारून स्वच्छता करतात व पाण्याची नासाडी करण्यासह महाजनकोला आर्थिक चुना लावतात.

बचत कमी अन् उधळपट्टी जास्त
हतनूर धरणातून दीपनगर बंधा-यात केवळ 25 जुलैपर्यंत पाण्याचे आवर्तन मिळणार आहे. यापुढील आवर्तने अत्यंत काटकसरीने मिळतील, असे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी टंचाई आढावा बैठकीत जाहीर केले आहे. भविष्यातील तीव्र टंचाईचे चित्र आता स्पष्टपणे दिसत असल्याने प्रशासनाचा पाणीबचतीवर भर असेल. दीपनगर केंद्रात मात्र याउलट चित्र आहे. येथे बचतीऐवजी पाण्याची उधळपट्टीच जास्त होताना दिसते. ठेकेदार व अधिका-यांचे हितसंबंध असल्याने कोणीही पाण्याची नासाडी थांबवण्यास तयार नसल्याची स्थिती आहे.

विषय गाजण्याची चिन्हे
ऊर्जामंत्री अजित पवार हे रविवारी सावदा (ता.रावेर) येथे कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. या दौ-यात ते दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला भेट देण्याची शक्यता आहे. त्यांनी भेट दिल्यास केंद्रातील पाण्याच्या नासाडीचा प्रश्न परिसरातील नागरिक आणि काही कामगार संघटना ऊर्जामंत्री पवारांसमोर मांडणार आहेत. दरम्यान, एकीकडे तापीतील बंधा-याने तळ गाठल्याने भुसावळकरांवर पाणीकपातीची कुºहाड कोसळली होती, तर दुसरीकडे भुसावळकरांसाठी सोडलेले पाणी स्वत:च्या बंधा-यात अडवणा-या दीपनगरात मात्र उधळपट्टी चालते. त्यामुळे आता हा विषय गाजण्याची चिन्हे आहेत.

भुसावळचे पाणी पळवले
भुसावळ शहराला हतनूर धरणातून 11 जून रोजी 1700 क्युसेस पाण्याचे आवर्तन मिळाले होते. मात्र, दीपनगर केंद्राने बंधा-याचा दरवाजा बंद केल्याने हे पाणी भुसावळपर्यंत पोहोचलेच नाही. त्यामुळे शहराला आठवडाभरापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भुसावळकरांचे पाणी पळवून दीपनगरात मात्र उधळपट्टी सुरू आहे.

प्रशासन कारवाई करणारच
राख वाहतूक करणारी वाहने प्रदूषण होऊ नये म्हणून धुण्याची मुभा आहे. मात्र, खासगी वाहने धुतली जात असल्याचा प्रकार संतापजनक आहे. वीजनिर्मितीसाठी पाण्याची नितांत गरज असताना कोणीही पाण्याचा अपव्यय करत असेल तर कारवाई होईल. आर.आर.बावस्कर, मुख्य अभियंता, औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, दीपनगर