आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ - दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून निघणार्या राखेमुळे होणारे प्रदूषण थांबविण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी वेल्हाळा ग्रामस्थांनी प्रजासत्ताकदिनी जलसमाधी आंदोलन केले. शनिवारी सकाळी 11 वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सलग सात तास नागरिकांनी राख आणि रसायनमिर्शित पाण्यात उभे राहून अभिनव आंदोलन केले.
विरोधीपक्षनेते एकनाथ खडसे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन महाजनकोच्या अधिकार्यांना खडेबोल सुनावले. ग्रामस्थांच्या किमान सहा मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील राख वेल्हाळा बंड क्रमांक तीनमध्ये सोडली जाते. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. 1953 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते भूमिपूजन झालेला ऐतिहासिक वेल्हाळा तलाव राखेच्या उत्सर्जनामुळे भरला आहे. प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यासह एकूण 12 मागण्यांसाठी ग्रामस्थांनी 18 जानेवारीला दीपनगर केंद्राच्या प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाने निवेदनाची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे प्रजासत्ताकदिनी सकाळी वेल्हाळा ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. आंदोलनकर्त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बंड क्रमांक तीनमध्ये सकाळी 11 वाजता सर्व ग्रामस्थ जमा झाले. जनता मासेमारी सोसायटीचे अध्यक्ष संतोष सोनवणे, शेतकी संघाचे संचालक योगेश पाटील, विकासोचे चेअरमन दिनेश पाटील, प्रगतशील शेतकरी मधुकर पाटील, विजय पाटील, मोहन सुरवाडे, मोहन पाटील, विक्रांत पाटील, राजेंद्र कोळी, ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा सुरवाडे, संध्या पाटील, ललिता पाटील, प्रतिभा पाटील, रोहिणी पाटील, अशोक शिंदे, राजेंद्र पाटील, पुंडलिक कोळी, दिनेश सुरवाडे, सुमन गायकवाड या आंदोलकांनी बंडात प्रवेश केला.
वेल्हाळय़ाचे ग्रामस्थ बंडाच्या काठावर उभे राहत आंदोलनाला पाठिंबा देत होते. दुपारी 3 वाजेपर्यंत तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही अधिकार्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली नाही.
दीपनगर केंद्राचे मुख्य अभियंता मनोहर गोडवे यांच्याशी आंदोलनापूर्वी चर्चा झाली होती. मात्र, त्यांनीही आंदोलकांची भेट घेणे टाळले. दोन अधीक्षक अभियंत्यांनी आंदोलकांचे मन वळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यांच्याकडूनही आंदोलकांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चौधरी यांनी या घटनेची माहिती राज्याचे विरोधीपक्षनेते एकनाथ खडसे यांना दिली. त्यानंतर खडसे तत्काळ आंदोलनस्थळी हजर झाले. विरोधीपक्षनेते आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर मुख्य अभियंता मनोहर गोडवे आणि उपमुख्य अभियंता एल.बी.चौधरी हेदेखील हजर झाले. जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र चौधरी यांनी प्रदूषणाची गंभीर समस्या खडसे यांच्यासमोर कथन केली. यामुळे संतप्त झालेल्या एकनाथ खडसे यांनी वीजनिर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता मनोहर गोडवे यांना खडेबोल सुनावले. महाजनकोचे व्यवस्थापकीय संचालक अजय शर्मा यांच्याशीदेखील एकनाथ खडसेंनी दूरध्वनीवरून चर्चा केली. विजेची गरज असल्याने प्रकल्प बंद करावा, अशी आमची मागणी नाही. मात्र, आंदोलनकांचे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत बंडात राख टाकू देणार नाही, असा सज्जड इशारा खडसे यांनी व्यवस्थापकीय संचालक शर्मा यांना दिला. त्यानंतर पाच मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दीपनगर प्रशासनाकडून मिळाले.
मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन
वेल्हाळय़ासाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची यंत्रणा कार्यान्वित करणे, राखेमुळे नादुरुस्त झालेले रस्ते दुरुस्त करणे, तलावातील राख काढावी, बंडात राख जाणार नाही याची उपाययोजना करणे, गावाला आरोग्य सुविधा पुरवून डॉक्टर उपलब्ध करणे, राखेमुळे बुजल्या गेलेल्या विहिरी वापरण्यायोग्य करणे, अशा पाच मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन आंदोलकांना प्रशासनाने दिले.
आंदोलकांचा असाही छळ
आंदोलक राखेच्या बंडात उतरल्यावर राखमिर्शित थंड पाणी बंडात सोडले जात होते. मात्र, दीपनगर प्रशासनाला आंदोलनाची माहिती मिळताच राखमिर्शित अतिशय गरम पाणी बंडात सोडण्यात आले. बंडाची जलपातळी वाढत असल्याने फ्लायअँश मिर्शित घट्ट द्रावण सोडण्यात आले. त्यामुळे आंदोलकांना जागेवरून हलणेही कठीण झाले होते. एवढय़ा छळानंतरही आंदोलक बाहेर येण्याचे नाव घेत नसल्याने दुपारी 2 वाजता राखमिर्शित पाणी बंद करण्याचा निर्णय दीपनगर प्रशासनाने घेतला हे विशेष!
लोकप्रतिनिधींना विसर
वेल्हाळे ग्रामस्थांनी केलेल्या जलसमाधी आंदोलनामुळे महत्त्वपूर्ण समस्या सुटण्याचे निदान आश्वासन मिळाले आहे. मात्र, पालकमंत्री गुलाबराव देवकर, आमदार संजय सावकारे यांनी आंदोलनाकडे पाठ फिरविली. वेल्हाळा तलावाचे भूमिपूजन पंडित नेहरू यांनी केले होते. मात्र, दुर्दैवाने काँग्रेस विचारधारेच्या लोकप्रतिनिधींनाच ऐतिहासिक तलाव वाचवण्याचा विसर पडला. नागो पाटील, आंदोलक, वेल्हाळा
प्रस्ताव वरिष्ठांना पाठवणार
वेल्हाळय़ाच्या आंदोलकांना लेखी आश्वासन दिले आहे. 12 पैकी पाच मुद्यांवर तत्काळ कामे सुरू केली जातील. तलावात राख जाऊ नये. तसेच रस्ते आणि गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवली जाईल. मागण्यांच्या मुंजरीसाठी वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठविला जाणार आहे. विलास वासुदेव पाटील यांच्या मालकीची राखेमुळे बुजलेली विहीर पूर्वस्थितीत आणली जाईल. मनोहर गोडवे, मुख्य अभियंता, वीजनिर्मिती केंद्र दीपनगर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.