आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगावर चिखल उडाल्याच्या कारणावरून धुळ्यात दंगल, माजी महापौरासह 23 जण अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - चिखल उडाल्याच्या क्षुल्लक कारणावरून शहरातील पवनपुत्र चौकात रविवारी दोन गटांमध्ये दगडफेक झाली. त्यानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून लपून बसलेल्या दंगलखोरांसह माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार, माजी महापौर भगवान करनकाळ यांच्यासह 23 जणांना अटक केली. या दोन गटांत गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती, त्यातूनच ही दंगल उसळल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


शहरातील गल्ली क्रमांक सहामधील पवनपुत्र आणि भांग्या मारुती गल्लीमध्ये रविवारी दुपारी मरीमातेचा मांडव निघाला. पवनपुत्र चौकातील तरुण विसर्जन करून परत येत असताना भांग्या मारुती विजय व्यायामशाळेचे तरुण मांडव घेऊन जात होते. या वेळी पिंटू करनकाळ या तरुणाच्या अंगावर चिखल उडाल्यामुळे वादाला तोंड फुटले. दोन्ही गट समोरासमोर आले व दगड, विटा, फरशी, काचेच्या बाटल्या भिरकावण्यास सुरुवात झाली. तसेच काठ्या, लोखंडी रॉड, सळई घेऊन दोन्ही गट परस्परांवर चालून गेले.


तणावामुळे दुकाने बंद
एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे माजी महापौर भगवान करनकाळ आणि माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांनी दोन्ही गटांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु दोन्हीही गट ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. या दहशतीमुळे परिसरातील दुकाने बंद होऊन तणाव निर्माण झाला होता. काही वेळाने पोलिस दाखल झाले, तेव्हा दंगेखोरांनी धूम ठोकली.


पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन
पोलिसांनी या वसाहतीत बंदोबस्त लावण्यासोबतच दंगलखोरांच्या शोधासाठी कोम्बिंग ऑपरेशनही सुरू केले. भांग्या मारुती विजय व्यायामशाळा, मनपाची पडीक शाळा तसेच बाजीराव पवार, भगवान करनकाळ यांच्यासह इतरांच्या घरात पोलिसांनी प्रवेश करून दंगलखोरांना अटक केली. तसेच काचेच्या बाटल्यांनी भरलेली गोणी, काठ्या आणि रॉड जप्त केले. काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाखाली आणून पोलिसांनी सुमारे 23 जणांना अटक केली होती. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.