आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vice Chancallor Meshram Wind Up The University Meeting

विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक कुलगुरूं मेश्राम यांनी गुंडाळली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - प्राध्यापक संघटनेने परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याच्या विषयावर चर्चा करण्याचा आग्रह फेटाळत कुलगुरूंनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेची सभा शनिवारी गुंडाळली. तसेच सुनील काळे यांना सदस्यत्व रद्द करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे इतर सदस्य संतप्त झाले आणि व्यासपीठावर जाऊन सभा गुंडाळल्याबद्दल कुलगुरूंना जाब विचारला.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची अर्थसंकल्पीय सभा कुलगुरू डॉ. सुधीर मेश्रीम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत सन 2012-13चा अर्थसंकल्प सादर करून संमत झाला. त्यानंतर विद्यापीठाशी निगडित विषयांवर चर्चेचा आग्रह सदस्यांनी धरला. प्राध्यापक संघटनेने बहिष्कार टाकल्यामुळे परीक्षा कामासाठी काय नियोजन केले? याबाबत नितीन ठाकूर यांनी माहिती विचारत चर्चेची मागणी केली; मात्र या प्रश्नावर विद्यापीठाकडून उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे सुनील काळे यांनी व्यासपीठावर जाऊन माइकचा ताबा घेत जाब विचारला; परंतु त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत कुलगुरूंनी ‘सभागृहात गोंधळ घातल्यास तुमचे सभासदत्व रद्द करीन’ अशी धमकी दिली. गोंधळ होत असल्याचे पाहताच राष्ट्रगीत सुरू करून सभा संपवली. यानंतर अमित दुसाने, योगेश मुकुंदे, नितीन ठाकूर आणि सुनील काळे यांनी यावर उत्तर देण्याचा आग्रह धरत व्यासपीठावर प्रवेश केला.

कुलगुरूंवर रोष : विद्यापीठाच्या अधिसभेत विद्यापीठाशी निगडित विषयांवर चर्चा होत नाहीत. मागील सभाही कुलगुरूंकडून गुंडाळण्यात आली होती. शनिवारीही त्याचीच पुनरावृत्ती झाली. सभेत गुणपत्रिकेतील फेरफार, राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यापीठात घेतलेला कार्यक्रम, धुळे येथील वलवाडी महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना संलग्नता नसल्यामुळे त्यांचे नाकारलेले प्रवेश, युवारंग या विषयांवर समाधानकारक उत्तरे दिली नाहीत व चर्चेलाही वेळ दिला नाही, असा आरोप सदस्यांनी कुलगुरूंवर केला.
अधिसभेची बैठक..
विषय विद्यार्थीहिताचे: विद्यापीठाने सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देणे अपेक्षित होते. तो त्यांचा अधिकारही होतो; मात्र उत्तर दिले गेले नाही.
त्यामुळे सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. सदस्य आक्रमक होतात, गोंधळ घालतात, असे भासवून सभा आटोपणे कितपत योग्य आहे? हा प्रकार म्हणजे सदस्यांचा अवमान आहे, अशी भावना अमित दुसाने यांनी व्यक्त केली. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने प्राध्यापकांना नोटीस देऊन परीक्षेची कामे करण्यास सांगितले आहे; मात्र आपल्या विद्यापीठाने काहीही कारवाई केलेली नाही, असे ते म्हणाले.
मी तिसर्‍यांदा विद्यापीठाच्या अधिसभेचा सदस्य आहे. यापूर्वी आमच्या प्रत्येक विषयांवर चर्चा होत होती. परंतु आता आवाज दाबण्याचा प्रयत्न करून सभासदत्व रद्द करण्याची धमकी देण्याचा प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे आम्ही याविरुद्ध कुलपतींकडे जाणार आहोत. सुनील काळे, सिनेट सदस्य
प्राध्यापकांच्या बहिष्कारासंदर्भात बोर्ड ऑफ एज्युकेशनची बैठक झाली आहे. तसेच मी स्वत: यासंदर्भात कुलपतींची भेट घेणार आहे. सभेत काही सदस्यांनी राष्ट्रगीत सुरू असताना गोंधळ घातला म्हणून त्यांना शांत बसवले. डॉ. सुधीर मेश्रीम, कुलगुरू
सदस्यांचा भोजनावर बहिष्कार
अधिसभा सदस्यांना विद्यापीठाकडून भोजनाचे आमंत्रण असते; परंतु कुलगुरूंकडून सुरू असलेल्या एकाधिकारशाहीच्या विरोधात सदस्यांनी भोजनावर बहिष्कार टाकला. तसेच कुलगुरूंविरोधात कुलपतींकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला.
पुतळय़ांसाठी 50 लाखांची तरतूद
विद्यापीठाचा 2013-14चा अर्थसंकल्प शनिवारी सादर झाला. त्यात काही तरतुदी करणार असल्याची माहिती ‘दिव्य मराठी’ने बैठकीपूर्वीच प्रसिद्ध केली. त्यानुसार विद्यापीठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारण्यासाठी अर्थसंकल्पात 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कर्मचारी निवासस्थाने, जलशुद्धीकरण योजना, तत्त्वज्ञान केंद्र, कर्मचारी-शिक्षक प्रोत्साहन योजना, विकलांग पाल्य बिनव्याजी योजना, अतिथिगृहासाठी भरीव तरतूद केली जाईल, अशी शक्यता ‘दिव्य मराठी’ने वर्तवली होती. त्यानुसार या तरतुदी झाल्या आहेत.