आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vidyanikethan School,Latest News In Divya Marathi

विद्यानिकेतनच्या तुकड्यांमध्ये पटसंख्या घसरल्याने होणार घट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हा परिषदेने इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग बंद केल्याने पाचवीच्या वर्गाला विद्यार्थी मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे 2014-15 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यानिकेतन शाळेची पटसंख्या घसरल्याने ही तुकडी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पंचायतराज समितीच्या दौर्‍यामुळे जिल्हा परिषदेने गेल्या वर्षी विद्यानिकेतनमधील इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग बंद केले होते. तसेच तेथे जिल्हा परिषदेने दिलेले शिक्षक मूळ शाळेवर पाठवले. चौथीपर्यंतचे वर्ग बंद झाल्याने यंदा पाचवीच्या तुकडीसाठी प्राचार्यांसह शिक्षकांना विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा लागला. त्यामुळे पाचवीसाठी जेमतेम 20 विद्यार्थी मिळाले आहेत. शहरात जिल्हा परिषदेची विद्यानिकेतन ही एकमेव शाळा असून, या शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येला दिवसेंदिवस गळती लागत आहे. महापालिकेच्या शाळांची तीच स्थिती आहे. मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार एक ते पाचवीसाठी 30 विद्यार्थ्यांमागे एक, तर सहावी ते आठवीसाठी 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक नियुक्त केला जाणार आहे.
तुकडी कमी होणार
विद्यार्थीसंख्या घटल्याने इयत्ता सहावी आणि आठवीच्या वर्गाची एक तुकडी कमी होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 30 सप्टेंबरच्या पटसंख्येवर तुकडी आणि अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांचे भवितव्य अवलंबून असून, त्यापूर्वीच विद्यार्थीसंख्या वाढवण्यावर शिक्षकांकडून भर दिला जात आहे.

अजूनही विद्यार्थी येत आहेत
यंदा पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र, एका तुकडीएवढी विद्यार्थीसंख्या होईल; परंतु इतर वर्गांची एखादी तुकडी कमी होऊ शकते. अजूनही विद्यार्थी प्रवेशासाठी येत आहेत. - भालचंद्र भावसार, प्राचार्य,

व्यापारी संकुल उभारण्याचा घाट!
विद्यानिकेतनची शहराच्या मुख्य भागात मोठी इमारत आहे. मात्र, विद्यार्थ्यांअभावी ती रिकामी पडली आहे. बर्‍याचदा जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या बैठकांसाठी या इमारतीचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त अनेक वर्ग रिकामेच असतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांकडून या ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत.

आठवी-नववीला पाच तुकड्या
पाचवीला एक, सहावीला दोन, सातवीला तीन, आठवी व नववीला पाच आणि दहावीला चार तुकड्यांना मंजुरी आहे. विद्यार्थी घटल्यास तुकड्यांची संख्यादेखील कमी होणार आहे. त्या तुलनेत यंदा दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या बर्‍यापैकी आहे.