आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावणाच्या उंचीसोबत बंदोबस्तही वाढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रावण दहन पाहण्यासाठी येणार्‍या पाऊण लाख जळगावकरांच्या सुरक्षा व वाहतूक नियंत्रणासाठी सुमारे 200 पोलिस सज्ज राहणार आहेत. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहनांना दुपारी 4 वाजेपासून शिरसोली रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. तर पार्किंगसाठी मेहरूण तलावाकडे जाणारे रस्ते व रावण दहनस्थळाच्या शेजारील टेकडीवरील सिमेंटच्या रस्त्यावर व्यवस्था करण्यात आली आहे.

रावण दहनाच्या स्थळात यंदा बदल करण्यात आला आहे. शिरसोलीरोड व मोहाडीरोड यादरम्यानच्या सुमारे 25 एकर जागेवर रावण दहन करण्यात येणार आहे. दरवर्षी मेहरूण तलावातील चौथर्‍यावर रावणाचे दहन करण्यात येते. त्यामुळे शहरात पाचोर्‍याकडून येणार्‍या वाहनांना र्शीकृष्ण लॉन समोरील रस्त्यावरून मोहाडी रोडमार्गे काव्यरत्नांवली चौकाकडे वळविण्यात येत होते. मात्र, यंदा या रस्त्यावरील अवजड वाहनांना रावण दहन होईस्तोवर बंदी करण्यात आली आहे. मात्र, हा मार्ग एस.टी. बसेसला वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे.

51 फुटी रावण बघण्यासाठी गर्दी वाढणार
या दसर्‍याच्या सोहळ्याला जळगावकरांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होते. दरवर्षी सुमारे 45 ते 50 हजार नागरिक प्रत्यक्ष सोहळा पाहण्यासाठी आपल्या वाहनांनी, पायी हजेरी लावतात. यंदा प्रथमच 51 फुटी रावणाची प्रतिमा असल्याने यात वाढ होऊन उपस्थितीचा अंदाज 75 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता पोलिस दलाला आहे. त्यामुळे गर्दीचा नवा उच्चांक प्रस्तापित होईल.

14 अधिकार्‍यांसह दोनशेवर कर्मचारी
रावण दहन सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास काळे, वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक रामकृष्ण भोसले यांच्यासह 14 अधिकारी व 155 पोलिस कर्मचारी 55 होमगार्ड बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत.

अर्धातास नयनरम्य आतशबाजीचे आकर्षण
युवा शक्ती व मनसतर्फे आयोजित ‘जळगाव नगरी भव्य दसरा उत्सव’ रविवारी सायंकाळी 7.45 वाजता पोलिस अधीक्षक एस. जयकुमार यांच्या हस्ते रावण दहन होणार आहे. रावण दहनाच्या वेळी 45 मिनिट नयनरम्य आतशबाजी बघायला मिळणार आहे. वातावरणात उत्साह यावा म्हणून डीजेची साथ राहणार आहे. पक्षविरहित असलेल्या या कार्यक्रमास महापौर राखी सोनवणे, उपमहापौर सुनील महाजन, सर्व नगरसेवक, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, आयकरचे अधिकारी बी.पी. सिंग, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, उद्योजक व अधिकारी आमंत्रित करण्यात आले आहे.

शिरसोली रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी
शिरसोली जळगाव रस्ता दुपारी 4 वाजेपासून रावण दहन होईपर्यंत अवजड वाहनांसाठी बंदी राहील. मोहाडी रोड व्हीआयपींसाठी राखीव करण्यात आला आहे. तर सर्व वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था मेहरूण तलावाकडे जाणार्‍या उपरस्त्यावर व तलावाजवळ करण्यात आली आहे. कार्यक्रमानंतर परत जाण्यासाठी चारचाकी वाहन मुख्य पाहुणे गेल्यानंतर र्शीकृष्ण लॉन समोरील रस्त्याने मोहाडी रस्त्याला जाता येईल. रामकृष्ण भोसले, निरीक्षक, वाहतूक शाखा