आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रस्त ग्रामस्थाने जिल्हाधिकारी कार्यालयात आणला नाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दोनवेळा तक्रार देऊनही स्वच्छतेबाबत दखल घेतली जात नाही म्हणून शिरसोली येथील एक त्रस्त नागरिक बरणीमध्ये नाग घेऊन चक्क जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आला होता. मात्र, त्या ग्रामस्थाला जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच अडवून जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना मंगळवारी दुपारी वाजता घडली.

शिरसाेली येथील गट क्रमांक मधील शिवाजीनगरात गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीने स्वच्छता केलेली नाही. त्यामुळे या परिसरात माेठ्याप्रमाणावर झुडपे वाढून सर्पांचे प्रमाण वाढले आहे. या भागात स्वच्छता व्हावी म्हणून गेल्या वर्षी ग्रामपंचायतीने ठराव केला. मात्र, वर्ष उलटूनही स्वच्छता केली नाही. त्यामुळे राजू बाबुराव बारी (वय ३९) यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले. मात्र, त्याचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपल्याला न्याय मिळेल, या अपेक्षेने राजू बारी यांनी सोबत नाग बरणीमध्ये घेऊन मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या दालनाबाहेरील सुरक्षा रक्षकाने त्याला अडविले. त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती देण्यात आली. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी बारी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पाेलिसांनी बारी यांना पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेचे राहुल पुंडलीक सावळे (रा. पिंप्राळा) यांच्या ताब्यात नाग दिला. वनविभागातर्फे पंचनामा करून नागाला जंगलात साेडण्यात येणार अाहे. बारी यांच्यावर मुंबई पाेलिस अॅक्ट प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले.
समस्या मांडण्याचा हा याेग्य मार्ग नाही
संबंधित व्यक्ती माझ्या दालनासमोर नाग घेऊन आला. तो दालनात आला नाही. त्यावेळेस मी सुनावण्या घेत होते. कर्मचाऱ्यांनी मला त्याबाबत माहिती दिली. मी पोलिस अधीक्षकांना फोन लावून माहिती दिली. समस्या मांडण्याचा हा विधायक मार्ग नाही. त्यांनी निवेदन देऊनही समस्या मांडता आली असती. रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी
बातम्या आणखी आहेत...