आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोईटे न्यायालयीन कोठडीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेले अँड. तानाजी भोईटे यांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, गुरुवारी पथकाने वीरेंद्र भोईटे यांच्या घरुन 10 फाईल जप्त केल्या असून त्यांच्या प}ीच्या नावे बॅँकेत 2 लॉकर असल्याची कबुली देखील भोईटे यांनी दिली आहे. ते लॉकर शुक्रवारी उघडण्यात येणार आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भोईटे यांचे बँकेतील लॉकर तपासायचे असल्याचे कारण सांगून पोलिस कोठडीची मागणी केली होती. ही मागणी न्यायालयाने मान्य करीत त्यांना बुधवारी एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्या कोठडीची मुदत गुरुवारी संपल्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय अधिकारी नजीर शेख यांनी भोईटेंना पुन्हा पोलिस कोठडी मिळावी म्हणून न्यायालयाकडे विनंती केली होती. मात्र अँड. भोईटे यांचे वकील सागर चित्रे यांनी आपल्या युक्तिवादात पोलिस कोठडीला जोरदार विरोध करीत त्यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली.

भोईटे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच त्यांनी अँड. चित्रे यांचेमार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर सरकारी वकिलांना न्यायालयाने आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले. मात्र, आता लागलीच म्हणणे सादर करणे शक्य नसल्याने वेळ मिळण्याची विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली. त्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. तसेच वीरेंद्र भोईटे यांची कोठडी संपणार असल्याने शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.