आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात विषाणूजन्य रोगांची साथ, ताप, सर्दी, न्यूमोनिया, गॅस्ट्रो, डायरियाचे रुग्ण वाढले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सध्या सर्दी, ताप, खोकल्यासह न्यूमोनिया, डायरियाचे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये व्हायरल फीव्हर असणार्‍या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. वातावरणात मोठय़ा प्रमाणात बदल झाला असून आजारांचे प्रमाण वाढले आहे. पावसाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी खड्डय़ांमध्ये, रस्त्यांवर पाणी साचल्याने साथीच्या आजारांचा फैलाव होत आहे. शाळा, महाविद्यालय सुरू झाल्याने लहान मुलांमध्ये संसर्ग देखील लवकर होत असल्याचे आढळून येत आहे. तसेच पावसात भिजल्यामुळे देखील आजारांना सामोरे जावे लागत आहे. यात लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे.

गॅस्ट्रोचे प्रमाण जास्त
लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांनाच पचनसंस्थेच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. पावसाचे नद्यांमधून येणारे पाणी तसेच काही ठिकाणी पाइपलाइन गळतीमुळे पाण्यामधून बॅक्टेरियल संसर्ग होण्याचा देखील धोका असतो. परिणामी अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. तसेच गॅस्ट्रोचे प्रमाण अधिक आहे. यात हगवण, डायरिया सारखे आजार होत आहेत. तापासह न्यूमोनियाचे रुग्ण सुद्धा आढळून येत आहेत. सध्याचे बहुतांश आजार हे विषाणूजन्य आहेत. यात ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण घराघरात दिसून येत आहेत. रुग्णामध्ये प्रतिकारशक्ती कमी झाल्यास त्याचे रूपांतर न्यूमोनियामध्ये होत असल्याचे तज्ञांनी सांगितले.

बालरुग्णालयांमध्ये गर्दी
शहरातील बाल रुग्णालयांत 50 ते 60 टक्के रुग्ण हे व्हायरल फीव्हर तसेच व्हायरल डायरियाचे आहेत. त्याचबरोबर सर्दी, खोकला, तापाचे रुग्णही वाढले आहेत. काही प्रमाणात बालकांमध्ये न्यूमोनिया दिसून येत आहेत. म्हणूनच लहान मुलांची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

अशी घ्या काळजी
औषध फवारणीचे आदेश

शहरात पावसाच्या रिपरिपमुळे साथीचे आजार बळावले आहेत. डास, अळ्या, कीटकांचे प्रमाण वाढले असल्याचा विषय स्थायी सदस्य चंद्रकांत सोनवणे यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत मांडला. आरोग्य विभागाने शहरात फवारणी, धूरळणी करण्याच्या तसेच औषध साठा नसल्यास तो खरेदी करण्याचे आदेश सभापती रमेश जैन यांनी दिले.

गॅस्ट्रो
0 पिण्याचे पाणी उकळून प्यावे.
0 चार पदरी वस्त्रगाळण हिताचे.
0 थंड खाद्यपदार्थ टाळावेत.

फ्लू
0 सर्दी, खोकला असणार्‍यांजवळ जाऊ नका.
0 वेळोवेळी हात स्वच्छ धुवा.
0 डिसइन्फेक्टंटचा वापर करा.

डेंग्यू मलेरिया
0 पाण्याची साठवण कमीतकमी करा.
0 साठवलेले पाणी जरूर झाकून ठेवा.
0 सर्व डासांपासून संरक्षण करा.

पिण्याचे पाणी उकळून प्यावे
सध्या व्हायरल फीव्हरचे प्रमाण अधिक असून सर्दी, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तसेच गॅस्ट्रोचे सुद्धा प्रमाण वाढले असून पिण्याचे पाणी उकळून प्यावे. डॉ. हेमंत पाटील, बाल रोगतज्ज्ञ.