आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच करू शकतो पालकमंत्री संजय सावकारेंचा पराभव - सुधाकर जावळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - भुसावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असलेले पालकमंत्री संजय सावकारे यांचा पराभव फक्त भारतीय जनता पक्षच करू शकतो, असा अजब राजकीय साक्षात्कार तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे यांना झाला आहे. त्यांनी यासंदर्भात रविवारी एक खळबळजनक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

मतदारसंघ भाजपला सोडण्यात यावा, या आशयाची मागणी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधीमंडळाचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याकडे केली आहे. आपल्या पक्षाला ही जागा सुटली तर 100 टक्के उमेदवार विजय मिळवू शकतो, असा विश्वास नेतेमंडळींना दिला असून तसा राजकीय सूत्रबद्ध अहवालही दिला आहे. युतीच्या जागा वाटपाच्या सूत्रानुसार हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असला तरी तो भाजपला सुटावा म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी लवकरच एक शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना होणार आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होण्यासाठी ही जागा निवडून येणे गरजेचे आहे. म्हणून या मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे, हे पक्षनेत्यांना आपण पटवून दिले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपलाच सुटेल, असा प्रबळ आत्मविश्वास ताुलकाध्यक्ष जावळे यांनी व्यक्त केला आहे.

० भुसावळ तालुक्यात 16 सरपंच, 166 ग्रामपंचायत सदस्य, 3 पंचायत समिती सदस्य, 1 जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकेत 11 नगरसेवक, तालुक्याची राजकीय राजधानी असलेल्या वरणगाव ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व अशी भारतीय जनता पक्षाची मजबुत ताकद आहे.
०भुसावळ विधानसभा क्षेत्रातून रक्षा खडसे यांना लोकसभा निवडणुकीत 58 हजारांचे मताधिक्य मिळाले. पूर्वी वरणगाव परिसर मुक्ताईनगर मतदारसंघात होता. त्यामुळे हा परिसर भाजपचा बालेकिल्ला आहे. म्हणून राष्ट्रवादीचा पराभव भाजपच करू शकतो, असे जावळेंना वाटते.

जावळेंचे तत्यांश अन् गृहीतकेही भन्नाट
मतदारसंघ भाजपला सुटला तर उमेदवार निवडून येण्यासाठी जी गृहीतके जावळेंनी दिले आहेत, त्यात पालिकेचा उल्लेख केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पालिकेत भाजपचे 11 नगरसेवक आहेत. मात्र, या सर्वांनी स्वतंत्र पक्षाचे अस्तित्व नगराध्यक्ष निवडीत सिद्ध करण्याचा प्रयत्नच केलेला नाही. या निवडीत नऊ जणांनी रा ष्ट्र वादीचे शहराध्यक्ष युवराज लोणारींना, एका नगरसेविकेने राष्ट्रवादीचेच पण संतोष चौधरी गटाचे उमेदवार अख्तर पिंजारींना तर एका नगरसेवकाने ‘कडी लावा आतील अन् मी नाही त्यातील’ या उक्तीचा प्रत्येय देऊन तटस्थ भूमिका घेतली आहे, या गोष्टींचा मात्र जावळेंनी डोळसपणे विचार केलेला दिसत नाही, हे पत्रकावरून स्पष्ट होते.

० भाजप तालुकाध्यक्षांनी भुसावळ मतदारसंघ आपल्या पक्षाला सोडण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे तर केली आहेच; पण पालकमंत्र्यांचा पराभव भाजपच करू शकतो, असे पत्रक प्रसिद्धीस देऊन शिवसेनेलाही डिवचले आहे. त्यामुळे युतीत लवकरच ‘पत्रक वॉर’ सुरू होण्याची ही चिन्हे आहेत.
० नगराध्यक्ष निवडीत अफलातून भूमिका घेतलेले नगरसेवक आणि नव्या फडीतील पदाधिका-यांमधून सध्या विस्तवही जात नसल्याचे चित्र आहे. ‘व्हीप वॉर’ तर थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. त्यातच आता तालुकाध्यक्ष जावळेंनी टाकलेला बाऊन्सर कोणाला जखमी करतो? याची प्रंचड उत्सुकता आहे.