आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्व शहा मृत्यू प्रकरण ; ठेकेदारासह पाच जणांवर गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जलतरण तलावात बुडून मृत्यू झालेल्या विश्व शहाच्या मृत्यूस जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर हे जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसेनेचे माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह विश्वच्या नातलगांनी शनिवारी पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल व जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन केले. याप्रकरणी दोषींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतल्याने पोलिसांनी तातडीने पावले उचलून पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत शिवसेनेचे माजी आमदार गुलाबराव पाटील व मयताच्या कुटुंबीयांनी शनिवारी सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालय आणि नंतर क्रीडा संकुलाच्या आवारात आंदोलन केले.
डीवायएसपींची घेतली भेट - माजी आमदार पाटील यांनी डीवायएसपी पंढरीनाथ पवार यांची भेट घेऊन जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांना अटकेची मागणी लावून धरली. पवार यांनी जिल्हापेठ पोलिसांना दोषींना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल - विश्वच्या मृत्यूप्रकरणी परेश आचरतलाल शहा यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार क्रीडा संकुलातील महिला जलतरण तलावाचे ठेकेदार भालचंद्र नगरकर, अजय काळे, अक्षय काळे, संदीप पवार, पंकज पवार यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक आर.व्ही.इंगवले तपास करीत आहेत.
क्रीडापटूंना काढले बाहेर - दोषींवर अटकेची कारवाई होईपर्यंत क्रीडा संकुलात कोणत्याही स्पर्धा होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत बाहेरगावाहून आलेल्या क्रीडापटूंना क्रीडा संकुलातून बाहेर काढले. अखेर महापौर विष्णू भंगाळे यांनी मध्यस्थी केल्याने क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश मिळाला.
जिल्हा रुग्णालयातही गोंधळ - आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा शिवसेनेने घेतल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक एस.एन.लाळीकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली. नंतर संबंधितांनी शवविच्छेदनाला परवानगी दिली.
जिल्हाधिकारी करणार सखोल चौकशी - जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी अप्पर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. समितीला 15 दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्हाधिकारी हे वैयक्तिक चौकशी करणार आहेत.
जमावाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल - जिल्हा क्रीडा संकुलात तोडफोड केल्याप्रकरणी सुभाष रेवतकर यांच्या फिर्यादीवरून जमावाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापौरांमुळे खेळाडूंना प्रवेश - जिल्हा क्रीडा संकुलात 5व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर जम्प रोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी राज्यातून विविध भागातील खेळाडू दाखल झाले आहेत. या वेळी शिवसेनेने आंदोलन करत येथे एकही स्पर्धा होऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन खेळाडूंना बाहेर काढले. ही बाब महापौर विष्णू भंगाळे यांना कळताच ते घटनास्थळी हजर झाले. त्यांनी गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करून खेळाडूंना पुन्हा प्रवेश मिळवून दिला.