आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voter ID Issue In Jalgaon Collector Office Jalgaon

मतदार ओळखपत्रांमध्ये दुरुस्तीनंतर पुन्हा चुका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मतदार ओळखपत्रातील दुरुस्ती आणि नव्या मतदार नोंदणीतून गेल्या महिन्यापर्यंत सव्वा लाख नवे मतदार नोंदले गेले; परंतु ओळखपत्र दुरुस्तीच्या खटाटोपाचा सामना करणार्‍या मतदारांवर पुन्हा मन:स्ताप करण्याची वेळ आली आहे. आधीची चूक दुरुस्त करताना मतदार ओळखपत्रात पुन्हा नवीन चुका झाल्या आहेत. आधी नावाची दुरुस्ती आणि आता तर फोटो महिलेचा आणि नाव पुरुषाचे, सर्वांचे एकच पत्ते यासह एकाच महिलेची दोन नावांची ओळखपत्रे देण्याचा विक्रम निवडणूक शाखेने केला आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून जिल्हा प्रशासनातर्फे मतदार ओळखपत्रांची दुरुस्ती आणि नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत चार हजार 386 मतदारांनी नाव, पत्ता, वय आणि छायाचित्रातील दुरुस्त्या करून घेतल्या. याआधीच्या मोहिमेतदेखील 6 हजार मतदारांवर दुरुस्तीसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली. खासगी ठेकेदारांकडून संगणकावर माहिती भरण्याचे काम केले जाते. त्यामुळे रोजंदारीवर असलेल्या संगणकचालकाकडून अशा चुका होत असल्याचे निवडणूक शाखेतील कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे.

पदभार स्वाती थवील यांच्याकडे

निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ.संतोष थिटे यांची मुंबई येथे बदली झाली. त्यामुळे निवडणूक शाखेचा पदभार सोमवारी विशेष भूसंपादन अधिकारी स्वाती थवील यांच्याकडे देण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी याबाबतच पत्र त्यांना मिळाले. मंगळवारी मतदार ओळखपत्रातील चुका आणि संबंधित एजन्सीबाबत माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुन्हा तोच कित्ता

ओळखपत्रात होणार्‍या चुकांच्या दुरुस्तीसाठी मतदारांनी मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान अर्ज भरून देण्याचा सल्ला तहसील कार्यालयाकडून दिला जात आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी मोहिमेत तोच कित्ता गिरवला जात आहे. दुरुस्तीसाठी प्रत्येक वेळी नवीन अर्ज करावा आणि ओळखपत्र मिळवण्यासाठी चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे.


यांनी केली तक्रार
कांचननगरातील जयर्शी चंद्रकांत अटवाल यांच्या ओळखपत्रावर नाव समाधान चव्हाण असे आहे. तसेच शीला शशिकांत पाटील यांचे नाव शिल्पा हिरामण पाटील असे टाकले आहे. शिवाय एकाच छायाचित्रांची दोन ओळखपत्रेही आहेत, ज्यावर सुलोचना अशोक सोनवणे आणि आशा सुनील सावकारे अशी नावे आहेत. आनंदा ओंकार वाघ यांच्या ओळखपत्रावर महिलेचा फोटो वापरण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पंधरा ओळखपत्रांवर ‘चौघुले प्लॉट’ हा एकच पत्ता असून, या सर्व चुकांबाबत तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली आहे.

मतदार ओळखपत्रातील चूकांनी गाठला कळस. एकाच छायाचित्राची दोन ओळखपत्रे देण्यात आली असून नावे मात्र वेगवेगळी आहेत.