आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मतदार नोंदणीची जबाबदारी विद्यार्थी कल्याण अधिकार्‍यांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा मतदारांचा टक्का वाढण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज भरून घेताना मतदार नोंदणीचा अर्जही भरून घेतला जाणार असल्याचा अभिनव उपक्रम जिल्ह्यात राबवला जाणार आहे. या उपक्रमाच्या नियोजनासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राचार्यांची बैठक घेण्यात आली.
या वेळी मतदार यादीत विद्यार्थ्यांच्या नावनोंदणीची जबाबदारी महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण अधिकार्‍यांवर सोपवण्यात आली आहे. बैठकीला जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे-पाटील, तहसीलदार गोविंद शिंदे आणि 22 महाविद्यालयांचे प्राचार्य व उपप्राचार्य उपस्थित होते. दरम्यान, यासंदर्भात प्रत्येक तालुक्यातही शनिवारी बैठक घेण्यात आली.

प्रत्येक महाविद्यालयाला 1000 अर्ज

‘विद्यार्थ्यांची मतदार यादीत नावनोंदणी’ या अभियानांतर्गत जिल्हा निवडणूक विभागाकडून प्रत्येक महाविद्यालयाला एक हजार मतदार नोंदणी अर्ज दिले जाणार आहेत. तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी हे नोंदणी अर्ज भरून घेणार आहेत. 10 दिवसांत मोठय़ा प्रमाणावर अर्ज जमा झाल्यावर त्या-त्या तहसीलदारांकडे जमा करण्यात येतील. विद्यार्थ्यांचे नाव यादीत नोंदवल्यानंतर ही यादी विद्यार्थी कल्याण अधिकार्‍यांकडे देण्यात येणार असून, सर्व मतदान कार्ड महाविद्यालयांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तहसील कार्यालयातील चकरा वाचणार आहेत.
बाहेरगावच्या विद्यार्थ्यांचीही नोंदणी
शहरात शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी बाहेरगावाहून येतात. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांची नावे मतदार यादीत नोंदवलेली नसतात. अशा विद्यार्थ्यांचीही नावेही या उपक्रमांतर्गत नोंदवण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यार्थी राहत असलेल्या वसतिगृहाच्या अधीक्षकांचे किंवा घरमालकाचे संमतीपत्र आणि रहिवासी पुरावा ही कागदपत्रे दिल्यानंतर नावनोंदणी होणार आहे. मात्र, ज्यांची नावे अगोदरच नोंदवलेली असतील ती रद्द करण्यात येतील.
स्तुत्य उपक्रम
जिल्हा प्रशासनातर्फे राबवण्यात येणारा हा उपक्रम स्तुत्य आहे. आमच्या महाविद्यालयाने तर प्रवेश अर्जातच मतदान कार्ड क्रमांक सक्तीचा केला आहे. त्यामुळे कोणाचे नाव मतदार यादीत नाही ते लगेच कळेल. या अभियानात एनसीसी आणि एनएसएसच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नोंदणी केल्यास अधिक फायदा होईल. कारण या विद्यार्थ्यांचा संपर्क अधिक असतो. डॉ.एन.व्ही.भारंबे, उपप्राचार्य, एमजे कॉलेज

कुलगुरू काढणार सक्यरुलर
विद्यार्थी मतदार नावनोंदणीसंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी सुरू केलेला उपक्रम प्रत्येक महाविद्यालयात राबवण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुधीर मेर्शाम हे परिपत्रक काढणार असल्याचे उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी सांगितले. तसेच निवडणूक आयोगाचा मतदार नोंदणीचा अर्ज क्रमांक 6 (अ) हा थोडा क्लिष्ट असल्याने काहींना समजत नाही. त्यामुळे शहरासाठी मराठीतून सोप्या पद्धतीचा अर्ज तयार करून घेतल्याचेही भांडे-पाटील यांनी या वेळी सांगितले.
मतदानाबाबत गांभीर्य नाही
आजच्या विद्यार्थ्यांना सोशल साइट्सवर चॅटिंग करणे माहीत आहेत; परंतु आपल्या मतदानाच्या मूलभूत हक्काबाबत ते गंभीर नसल्याची स्थिती आहे. या उदासीनतेमुळे 18 ते 19 वर्षे वयोगटातील 40 टक्के विद्यार्थ्यांची नावे मतदार यादीत नाहीत. त्यामुळे ज्या महाविद्यालयात 100 टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी होईल त्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा 15 ऑगस्टला सत्कार करण्यात येईल. रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी