आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voting News In Marathi, Voting Time Increasing Issue At Jalgaon, Divya Marathi

मतदानवाढीसाठी वेळेत केली एक तासाने वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव / धुळे- उन्हाळ्याचे दिवस असल्याने मतदारांना मतदानासाठी जाणे सोईचे व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने या वेळी एक तास वेळ वाढवला आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदार मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू शकतील. एक तासाने वेळ वाढविल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची अपेक्षा आयोगाने व्यक्त केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी जळगावात आणि प्रकाश महाजन यांनी धुळयात पत्रकार परिषदेत दिली.

मतदानाची टक्केवारी वाढण्याचे उद्दिष्ट
जळगाव जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत केवळ 45 टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. इतर जिल्ह्यांत मतदानाची टक्केवारी जास्त आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. जळगावमध्येही आम्ही मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्नशिल आहे. जिल्ह्याभरात 115 टीम फिरत आहेत. 70 संवेदनशील मतदान केंद्राचा अभ्यास करण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या.

25 एप्रिलला सुटी देऊ नये
24 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यानिमित्त कारखान्यात, खासगी आस्थापनांवर काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना मतदान करण्यासाठी सुटी देण्यात आली आहे. त्यानुसार या सुटीला जोडून कर्मचारी मतदान न करता सुटी एन्जॉय करण्याची शक्यता असल्याने सर्व आस्थापनांनी 25 एप्रिलला कुठल्याही कर्मचार्‍याला रजा देऊ नये, अशी सूचना चामी यांनी बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या.

आचारसंहिता भंगाच्या तक्रारी
रावेर मतदारसंघात एक तर जळगाव मतदारसंघात सात जणांनी आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. आचारसंहिता कक्षाकडून या तक्रारीची चौकशी केली जात आहे.

30 हजार जणांची आवश्यकता
निवडणूक प्रक्रियेसाठी दोन्ही मतदारसंघात 17 हजार 557 कर्मचार्‍यांच्या नियुक्तीचे आदेश शनिवारी काढण्यात आले आहेत. अधिकारी, निरीक्षक, पोलिस आणि शिपाई यांच्यासह एकूण 30 हजार जणांची निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. दुसर्‍या टप्प्यातील आदेश मंगळवारी काढले जाण्याची शक्यता आहे.