आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरपालिकेच्या मतांची टक्केवारी वाढली, उपद्रवी मतदान केंद्रांना आले छावणीचे स्वरूप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - अत्यंत उत्कंठावर्धक आणि चुरशीच्या पालिका निवडणुकीत रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. शहरातील सतारे, डी. एस. हायस्कूलसह अन्य तीन मतदान केंद्रांवर रात्री ८.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. डिसेंबर २०११मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत ५५.६७ टक्के मतदान झाले होते. तर सध्याच्या निवडणुकीत तब्बल ५८.३३ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत वाढलेल्या मतांचा टक्का कोणाला फायद्याचा ठरणार, हे आता सोमवारी मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
सोमवारी दुपारी वाजेपर्यंत शहरातील निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या तसेच माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, आमदार संजय सावकारे यांची प्रतिष्ठा आणि माजी आमदार संतोष चौधरी यांचे राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. नगराध्यक्षपदाच्या दहा तर नगरसेवकपदाच्या ४८ जागांसाठी २४ प्रभागांतून रिंगणात असलेल्या २५२ मतदारांचे भवितव्य रविवारी ईव्हीएममध्ये बंद झाले. सकाळपासून संथगतीने सुरू असलेल्या मतदानाची टक्केवारी दुपारनंतर वाढली. या मतदान प्रक्रियेत शहरातील ४९ हजार ८६९ पुरुष तर ४२ हजार ६५८ अन्य अशा ९२ हजार ५२७ मतदारांनी हक्क बजावला. सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी थंडीचे प्रमाण अधिक असल्याने बहुतांश मतदान केंद्रांवर सकाळी वाजेपूर्वी गर्दी नव्हती. सकाळी १०.३० वाजेपासून काही प्रमाणात गर्दी वाढली. दुपारी एक वाजेपर्यंत बहुतांश ठिकाणी गर्दीचे प्रमाण अत्यल्प होते. सकाळी ११ वाजता शहरातील केवळ भुसावळ हायस्कूलच्या मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र दिसले. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह असल्याने मतदान रेंगाळले नाही. शहरातील सतारे भागातील पालिका शाळेतील प्रभाग सातच्या /१ आणि /२ या मतदान केंद्रांवर रविवारी सायंकाळी सात ते साडेसात वाजेपर्यंत मतदान सुरू होते.

१५ हजारांचा लीड घेणार
^जनआधार विकास पार्टीला शहरातून ३३ जागांवर बहुमत मिळेल. तर नगराध्यक्षपदासाठी मला १५ हजारांचे मताधिक्य राहील. नागरिकांनी भरभरून प्रेम दिल्याने आम्ही त्यांच्या ऋणात राहू. सचिनचौधरी, नगराध्यक्षपदाचे उमेदवार, जनआधार विकास पार्टी

नववधूने केले मतदान : पालिकानिवडणूकीला अनन्य साधारण महत्व आले होते, यामुळे वयोवृध्दांना थेट पाठीवर आणून मतदान करुन घेण्यात आले. इतकेच नव्हे तर सुधा ओमप्रकाश शर्मा या नववधूने बिदाई काही वेळ थांबवून मतदानाचा हक्क बजावला. दोन्ही उभयतांनी मतदान केंद्रावर येवून मतदानाचा हक्क बजावल्याने परिसरात चर्चा रंगली.

बोगस मतदानाच्या तक्रारी
शहरातील प्रभाग क्रमांक २४ मधील नाहाटा महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. याबाबत शहरातील सर्वच भागांमध्ये चर्चा रंगली होती. यासह शहरातील मुस्लिम बहुल भागातही शहरात नसलेल्या मतदारांच्या नावे बोगस मतदान झाले. यासह शहरात मतदारांना पैसे वाटप करण्याच्या तक्रारी झाल्या. मात्र, याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांत कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

अल्पवयीनाने केले मतदान
शहरातील टेक्निकल हायस्कूलमधील मतदान केंद्र ३६मध्ये अल्पवयीनाने मतदान केल्याची तक्रार प्रभाग पाच- चे उमेदवार विजय प्रभाकर पवार यांनी केली. प्रभाग पाचमधील चार ते पाच मतदारांनी वयाची अट पूर्ण करताच मतदार यादीत नावे समाविष्ट केली होती. याबाबत पवार यांनी यापूर्वी तक्रार केली असतानाही यातील एका मतदाराने मतदान केले. याबाबत कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

सेक्टरमध्ये विभागणी
मतदानाच्या पार्श्वभूमीवर १० सेक्टरमध्ये बंदाेबस्त विभागण्यात आला होता. मतदान केंद्रांच्या परिसरात जाण्यास दुचाकी वाहनधारकांना मनाई केली जात होती. तसेच पैसे वाटण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी शहरातील सर्व भागात गस्त ठेवण्यात आली.

भाजपचे निर्विवाद वर्चस्व
^भाजपला नागरिकांनी पसंती दिल्याचे चित्र शहरात आहे. नगराध्यक्षपद आणि नगरसेवकांना अभूतपूर्व मताधिक्य मिळेल. बहुमताने सर्व जागा निवडून येतील. पालिकेवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व राहील, असा विश्वास आहे. रमण भोळे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार, भाजप
बातम्या आणखी आहेत...