आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाघूर प्रकरण ‘सह्या’जीरावांचे बोट पुन्हा ‘बंगल्या’कडेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरकुल घोटाळ्यानंतर आता वाघूर पाणीपुरवठा योजनेतील गुन्ह्याच्या तपासातही सत्ताधारी गटाचे नगरसेवक कानावर हात ठेवत असून आपण केवळ ‘सह्या‘जीराव होतो, अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे या प्रकरणातूनही ‘7, शिवाजीनगर’कडेच अंगुलीनिर्देश होऊ लागला आहे.

वाघूर पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी तपासाची सूत्रे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत बच्छाव यांनी हाती घेतली असून आरोपींचे जबाब नोंदवायला त्यांनी गुरुवारपासून सुरुवात केली. पहिल्याच दिवशी सत्ताधारी गटातील चंद्रकांत कापसे आणि चुडामण पाटील यांनी एसडीपीओ कार्यालयात जाऊन जबाब नोंदवले. त्या वेळी विरोधक असलेले चंद्रकांत सोनवणे यांचाही जबाब नोंदवण्यात आला.

आजही तिघांचे जबाब
याच प्रकरणात शुक्रवारी विजय वाणी, डी.डी. वाणी आणि लक्ष्मीकांत चौधरी यांना जबाब देण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

24 आरोपींची धावपळ
घरकुल घोटाळा प्रकरणात गुरुवारी सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर न राहाणार्‍या 24 आरोपींना न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावण्याचा इशारा देताच त्यांची प्रचंड तारांबळ उडाली. कारवाई टाळण्यासाठी धावपळ करीत त्यांना न्यायालय गाठावे लागले.

वकिलांच्या विनंतीवरून न्यायालयाने वेळ वाढवून दिल्यामुळे वॉरंटची कारवाई 50 रुपयांच्या दंडापर्यंत र्मयादित राहिली. सायंकाळी या सर्व आरोपींनी दंडाची रक्कम अदा केली. त्यात माजी राज्यमंत्री आमदार गुलाबराव देवकर यांचाही समावेश होता. अन्य आरोपी असे. पी.डी. काळे, सरस्वती कोळी, चंद्रकांत कापसे, विजय वाणी, पुष्पा पाटील, सुभद्रा नाईक, वासुदेव सोनवणे, देविदास धांडे, अरुण शिरसाळे, अशोक परदेशी, लिलाधर सरोदे, गुलाबराव देवकर, पुष्पलता अत्तरदे, पांडुरंग काळे, निर्मला भोसले, लता भोईटे, अलका लढ्ढा, मीना मंधाण, मीना वाणी, पुष्पलता सरोदे, विमल पाटील, सुधा काळे, मुमताजबी शेख आणि भगत बालाणी.

महत्त्वाच्या चर्चा बंगल्यावर होत : कापसे
चंद्रकांत कापसे यांनी सांगितले की, ही योजना जळगावकरांच्या हिताची असल्याचे सभागृहात सांगण्यात आल्यामुळे आपण त्या विषयाला संमती दिली होती. योजनेविषयी इतर निर्णय हे ‘बंगल्या’वर होत असत. त्यामुळे आपल्याला त्याबद्दल काहीही माहित नव्हते, अशा अर्थाचा जबाब आपण नोंदवला आहे.

मी तर विरोधक : चंद्रकांत सोनवणे
चंद्रकांत सोनवणे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, आपण या योजनेच्या मंजुरी आणि अंमलबजावणीवेळी विरोधी गटात होतो. त्यामुळे या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, असा जबाब आपण नोंदवला आहे.

पालिकेतल्या सभा औपचारीक : पाटील
चुडामण पाटील यांनीही त्याच अर्थाचा जबाब नोंदवला असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, पालिकेतल्या सभा औपचारिकता होती आणि 10 मिनिटात संपत होत्या. सर्व निर्णय बंगल्यावर घेतले जात. चांगल्या उद्देशाने ठरावावर आपण सह्या केल्या होत्या, असे आपण तपासाधिकार्‍यांना सांगितले आहे.