आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघूर जलवाहिनीचे काम सुरू; आज पाणी नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूरच्या मुख्य १५०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी सकाळी हाती घेण्यात आले होते. मात्र, दुपारी अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे हाती घेतलेले काम थांबवण्याची वेळ पाणीपुरवठा विभागावर आली. भरपावसात काम करणे शक्य नसल्याने हे काम रात्री वाजेच्या सुमारास हाती घेण्यात आले. त्यामुळे शहरात शुक्रवारीदेखील पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही.

शहरातील पाणी गळत्यांची ‘दिव्य मराठी’ने मालिका लावल्यावर प्रशासनाने मोठ्या गळत्यांचे काम हाती घेतले आहे. दोन आठवड्यांपूर्वी अयोध्यानगरच्या प्रवेशद्वाराजवळील गळती दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर एमआयडीसी परसिरातील अजिंठा हाफकीन समोरील या गळती दुरुस्तीचे काम गुरुवारी हाती घेण्यात आले होते. सकाळी ७.३० वाजेपासून जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदण्यास सुरुवात झाली होती. मात्र, दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसानंतर काम थांबवण्यात आले होते. खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचत असल्याने अशा परिस्थितीत काम करणे शक्य नव्हते. सायंकाळपर्यंत पावसाचा अंदाज घेऊन सायंकाळी वाजता पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. त्यामुळे शुक्रवारचा पाणीपुरवठा होणार नाही. पाणीपुरवठा विभागाने जाहीर केल्याप्रमाणे संपूर्ण शहराचे पाणीपुरवठ्याचे रोटेशन एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी ज्या ठिकाणी पाणी येते त्या ठिकाणी शनिवारी पाणी येईल.
मेहरूणची गळती पुढील आठवड्यात काढणार
मेहरूणपरसिरात स्मशानभूमी रस्त्यालगत सहा महिन्यांपासून गळती सुरू आहे. याठिकाणी दुरुस्तीचे काम पुढील आठवड्यात २७ किंवा २८ तारखेला हाती घेण्याचे प्रशासनाचे नियोजन होते. या कामालादेखील किमान २५ ते ३० तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्या वेळी वॉटर मीटर इतर कामे करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.