आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल तालुक्यातील बामणोद येथे भिंत कोसळून पाच ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळल्याने ढिगार्‍याखाली दबून एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार झाल्याची घटना बामणोद (ता. यावल) येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. मृतांमध्ये दोन महिलांसह तीन बालकांचा समावेश आहे.

बामणोद गावातील खाटीक वाड्यातील रहिवासी जुबेदाबी करीम पिंजारी (वय 55) कुटुंबीयांसह घरात झोपल्या होत्या. गुरुवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे त्यांच्या घराची मागील भिंत कोसळली. जुबेदाबी यांची विधवा मुलगी आलीशान बी रईस पिंजारी (वय 32) व त्यांची मुले रमजान रईस पिंजारी (वय 6), समीर रईस पिंजारी (वय 4), शमीना बी करीम पिंजारी (वय 18) व अफजल शेख चाँद पिंजारी (वय 9, रा.शिरसोली) या पाच जणांचा ढिगार्‍याखाली दबून मृत्यू झाला. मातीच्या ढिगार्‍याखाली जुबेदाबी व त्यांचा मुलगा चिरागोद्दीन पिंजारी हेदेखील सापडले होते. मात्र, भिंत कोसळल्यामुळे मोठा आवाज झाल्याने शेजार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचवले. जुबेदाबींचे शेजारी शिवराम तायडे, पंचायत समिती सदस्य विलास तायडे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यास सुरुवात केली. मात्र, परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या.

पाचही मृतदेह रात्रीच भालोद (ता.यावल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. डॉ.कल्पना दवंगे (पाडळसा), डॉ. मंगेश मेढे (हिंगोणा), तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बर्‍हाटे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी यांनी शवविच्छेदन केले. सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. शुक्रवारी दुपारी 1 वाजता बामणोदला शोकाकुल वातावरणात दफनविधी पार पडला.

यांनी दिली भेट : घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी डॉ.अरविंद अंतुर्लीकर, डीवायएसपी देवेंद्र शिंदे, तहसीलदार कैलास कडलग यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. पालकमंत्री संजय सावकारे, खासदार हरिभाऊ जावळे, आमदार शिरीष चौधरी, अपर पोलिस अधीक्षक एन. अंबिका, शरद महाजन, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, पंचायत समिती सदस्य विलास तायडे, सरपंच दिलीप बाविस्कर यांनी सकाळी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले.