जळगाव - महापालिकेच्या स्थायी समिती सभापती ज्योती चव्हाण यांच्या आदर्शनगर, गणपती नगरातील व्हॉल्व्हमन गेल्या पाच वर्षांपासून कामावरच आलेला नाही. त्याच्या जागी काम करणारा व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून एक पैसाही घेता नियमित पाणी सोडत असल्याचा गौप्यस्फोट स्वत: सभापतींनीच केला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागातील गलथान कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
स्थायी समितीची सभा शुक्रवारी सकाळी ११ वाजता सभापती चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात सभापती राहत असलेल्या आदर्शनगर गणपतीनगरातील पाणीपुरवठा विभागाचा व्हॉल्व्हमन येत नाही. त्याच्या जागी काम करणारा व्यक्ती हा पाच सहा वर्षांपासून मेहनत घेताच काम करीत असल्याचे सांगताच नगरसेवक अवाक् झाले. खाविआचे नेते नितीन लढ्ढा यांनी सुरू असलेल्या प्रकारावर प्रकाश टाकत पैसे अथवा पगार घेता एखादा व्यक्ती इतके दिवस कसे काय काम करतोय? असा प्रश्न उपस्थित केला.
पाणीपुरवठा अभियंता डी.एस.खडके याविषयावर मात्र निरुत्तर झाले. अनेकदा तक्रार करूनही निपटारा होत नसल्याची खंत सभापतींनी व्यक्त केली. विधी शाखाप्रमुख दामोदर मोरे निवृत्त झाल्याने ते पद रिक्त आहे. दरम्यान, अॅड.केतन ढाके यांची दररोज चार तासांसाठी विधी शाखेवर नियुक्तीचा ठराव केला.
नगरसेवकांना भीती अटकेची
पालिकेच्या मालकीचे स्कीम लोडर कचरा उचलण्यासाठी मक्तेदाराला गरज भासल्यास ते भाड्याने देण्याबाबतचा विषय स्थायी समितीत मांडण्यात आला. मात्र, कायद्यात पालिकेची वाहने मक्तेदाराला भाड्याने देण्याची तरतूद आहे का? सरकारी वाहने भाड्याने दिल्यास अडचणी येऊ शकतात. तसे केल्यास नगरसेवकांना अटक होऊ शकते. त्यामुळे आमचा विरोध असल्याचे नगरसेवक गणेश सोनवणे यांनी सांगितले.
स्थायी समिती सभेत पुन्हा एकदा कायद्याची चौकट ओलांडताना चार वेळा विचार करताना नगरसेवक पाहायला मिळाले. आज निर्णय घ्यायचा आणि १० वर्षांनी गुन्हे दाखल व्हायचे, अशी भीतीही सोनवणे यांनी बोलून दाखवली. त्यामुळे वाहन भाड्याने देण्याचा विषय महासभेतच ठेवण्याची सूचना करण्यात आली.