आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल मॅपच्या आधारे प्रभागरचना, १३ नगरपरिषदांच्या निवडणुकांत होणार अंमलबजावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्ह्यातील१३ नगर परिषदांची मुदत डिसेंबर २०१६पर्यंत संपत आहे. येथील प्रभागांची रचना गुगल मॅपच्या आधारे करून स्थानिक केबल नेटवर्कवरून आरक्षण सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाचे उपसचिव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

डिसेंबर २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगर परिषदांमध्ये भुसावळ, पारोळा, यावल, पाचोरा, बोदवड, मुक्ताईनगर, धरणगाव, सावदा, अमळनेर, रावेर, चाळीसगाव यांचा समावेश आहे. येथील प्रभाग रचनेचा आरक्षणाचा कार्यक्रम गेल्या गुरुवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील १३ नगर परिषदांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच नगर परिषदांची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने १९ मे २०१६पासून नगर परिषदांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात दोन किंवा तीन सदस्य निवडले जातील; तसेच राखीव जागांचे वाटप चक्रानुक्रमे केले जाईल. १३ जूनच्या आदेशाप्रमाणे नगरपंचायतीमध्ये प्रभागात एकच सदस्य निवडून द्यावयाचा आहे. याबाबतचे आदेशही निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

प्रारूप रचना, हरकती, सूचना
आरक्षणासह प्रारूप प्रभाग रचना करणे, हरकती सूचनांवर सुनावणी अंतिम प्रभाग रचना असे प्रभाग रचनेचे तीन प्रमुख टप्पे आयोगाने निश्चित केले आहेत. आता प्रभाग रचनेसाठी गुगल मॅप वापरून त्यावर प्रगणक गट दर्शवण्यात येणार आहेत. अनुसूचित जाती जमाती यांच्या आरक्षणासह प्रभाग रचनेचा प्रारूप प्रस्ताव मुख्याधिकारी तयार करतील. अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग याच प्रवर्गातील महिला यांची सोडत आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्हाधिकाऱ्यांतर्फे काढली जाईल.